सूरज कसबे, प्रतिनिधी
Pune-Mumbai Highway : पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील (Pune-Mumbai Old Highway) तळेगावजवळील सोमाटणे फाटा (Somatane Phata) परिसर गुरुवारी एका थरारक घटनेने हादरला. घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी आपला पाठलाग करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या (Crime Branch Unit Two) पथकावर थेट पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि पोलिसांनी अत्यंत शिताफीने तिन्ही आरोपींना अटक करून त्यांची मुसक्या आवळल्या.
थरारक पाठलाग आणि गोळीबार
गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करत होते. आपला पोलिसांकडून पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पोलिसांवर थेट एक गोळी झाडली. ही गोळीबार करण्याची घटना अत्यंत धोकादायक होती, परंतु पोलिसांनी जराही न डगमगता आरोपींचा पाठलाग सोडला नाही. अखेर, मोठ्या हिमतीने पोलिसांनी या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि पुणे-मुंबई महामार्गावरचा हा थरार संपुष्टात आणला.
( नक्की वाचा : Pune News : हिंजवडीत 20 चिमुकल्यांना कोंडून अंगणवाडी सेविका कुठे गेल्या ? निष्पाप मुलांच्या जीवाशी खेळ! )
अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे अत्यंत सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या गुन्हेगारीचा इतिहास मोठा असून, त्यांच्यावर प्रत्येकी 30 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे या आरोपींना जेरबंद करणे ही पोलिसांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची कारवाई ठरली आहे.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी
- सनिसिंग पापासिंग दुधानी
- जलसिंग राजपूतसिंग दुधानी
- मनीष बाबुलाल कुशवाह
आरोपींकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा आणि गुन्ह्यांमध्ये वापरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 7 जिवंत काडतुसे (Live Cartridges), सोन्या-चांदीचे दागिने, घरफोडीसाठी वापरलेली अवजारे (Tools) आणि एका चारचाकी वाहनाचा समावेश आहे.
( नक्की वाचा : Pune News : ऑपरेशनमध्ये भयंकर चूक! प्रसूतीनंतर पोटात टॉवेल, महिलेचा जीव गेला; पुण्यातील हॉस्पिटलला मोठा झटका )
ही धाडसी आणि यशस्वी कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलिस उप आयुक्त शिवाजी पवार, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा दोनचे पोलिस निरीक्षक अरविंद पवार आणि त्यांच्या पथकातील साळुंखे, गवारे, कुदळे, राठोड, शेटे, चव्हाण, नदाफ, शितोळे, सैद, राणे, गावडे, जाधव या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी अत्यंत हिंमतीने यशस्वी केली. गुन्हेगारीला लगाम घालणाऱ्या या कामगिरीबद्दल सर्वत्र पोलिसांचे कौतुक होत आहे.