वैष्णवी हगवणे हिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. त्यातूनच तिने आत्महत्या करण्या सारखं टोकाचं पाऊल उचललं. हे प्रकरण ताजं असतानाच पुण्यातील हडपसर इथं अशीच एक घटना समोर आली आहे. लग्नाला एक महिना पूर्ण होत नाही तोच इथं एका विवाहीतेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नात मनासारखा हुंडा न दिल्याने सासरी तिचा छळ केला जात होता. विशेष म्हणजे लग्नात 4 तोळे सोने आणि 10 लाखाचा खर्च विवीहीतेच्या कुटुंबीयांनी केला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दीपा उर्फ देवकी प्रसाद पुजारी ही 22 वर्षाची तरूणी. 18 एप्रिलाच तिचं लग्न झालं होतं. म्हणजे जेमतेम एक महिन्यापूर्वी ती नव्या संसाराची नवी स्वप्न डोळ्यात घेवून पुण्यात आली होती. पण एक महिन्यातच तिच्या या स्वप्नांची राखरांगोळी झाली. 18 एप्रिलला विजयपूरच्या बागेवाडीतील बसव मंगल कार्यालयात तिचं लग्न झालं होतं. पुण्यात राहाणाऱ्या प्रसाद पुजारी बरोबर ती लग्न बंधनात अडकली होती. लग्नात दीपाच्या घरच्यांनी हुंडा म्हणून प्रसादला 4 तोळे सोने दिले होते. शिवाय 10 लाख रुपये खर्च करुन लग्न लावून दिले होते.
लग्नानंतर दीपा पुण्यात आली. ज्या दिवशी ती पुण्यात सासरी नांदण्यासाठी आली त्याच दिवसापासून तिचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला. नवरा आणि सासू लग्नात भांडी, फ्रीज दिले नाहीत. आमचा आणि आमच्या नातेवाईकांचा मानपान केला नाही असं म्हणू लागले. त्यातून तिच्या बरोबर खटके ही उडू लागले. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असं काही होईल असं तिने स्वप्नातही पाहिलं नसेल. त्यामुळे तिने झालेला सर्व प्रकार आपल्या वडीलांच्या कानावर घातला. शिवाय तिने तातडीने आपलं माहेर ही गाठलं. लग्नाच्या काही दिवसातच दीपा माहेरी गेली होती.
अशा स्थितीत दीपाच्या सासऱ्यांनी मध्यस्थी केली. दीपाची समजूत काढून ते तिला पुन्हा पुण्याला घेवून आले. पण परिस्थिती काही सुधारली नाही. लग्नात भांडी दिली नाहीत. घरचे सामान दिले नाही. त्यावरून दीपाचा छळ सुरूच होता. त्यात घरातले सर्वच जण सहभागी होते. सासू, सासरे,दीर आणि नवराही तिला शिवीगाळ मारहाण करत होते. या सर्वाला ती वैतागली होती. झालेली घटना परत तिने आपल्या वडीलांच्या कानावर घातली. त्यावर वडीलांनी आपण पुण्यात येतो. त्यानंतर या विषयावर तोडगा काडू असं मुलीला समजवून सांगितलं. तिने हा फोन 18 मे ला आपल्या वडीलांना केला होता.
पण वडील येईपर्यंत दीपाला तिच्यावर होणारा अन्यात सहन झाला नाही. तिने दुसऱ्याच दिवशी म्हणजे 19 मे ला हडपसर इथं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. लग्नाच्या एक महिन्यातच तिने हुंड्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. वैष्णवी हगवणेचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात ही दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी दीपाचे वडिल गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.