राहुल कुलकर्णी -सूरज कसबे
सध्या पुण्यातल्या मुळशीमध्ये एक वेगळाच पॅटर्न दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुळशी तालुक्यातल्या एका मंदिरात मुस्लिम कामगाराकडून विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर अख्ख्या गावाचं गणितच बिघडलं आहे. एकीकडे गावांमध्ये अघोषित बहिष्कार घातला गेल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे या वादाला स्थानिक विरुद्ध परप्रांतीय अशी किनारही दिली जात आहे. त्यामुळे सध्या मुळशीत नक्की काय घडतंय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातल्या मुळशी तालुक्यातली पौड, पिरंगुट गावं आहे. सध्या या गावांमध्ये एक वाद धुमसत आहे. या गावात परप्रांतीय मुस्लिमांच्या अनेक बेकऱ्या आहेत. या बेकरी अनेक मुस्लिम काम करतात. त्यापैकी एका कामगारानं मंदिरामध्ये विटंबना केली होती. त्यानंतर हिंदू संघटनांनी गावात मोर्चा काढला. तेव्हापासून अल्पसंख्याकांच्या दुकानावर बहिष्कार टाकल्याचा आरोप होत आहे. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजने हा आरोप केला आहे. आमच्या बेकरीमधील माल गावकरी आता घेत नाही असा आरोप गावातीलच मुस्लिमांनी केला आहे.
मूळचं उत्तर प्रदेशातलं शेख कुटुंब काही वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक झालं आहे. त्यांची तिसरी पिढी आज बेकरीचा व्यवसाय करत आहे. याच शेख कुटुंबानं कामाला ठेवलेल्या एका मुलानं मंदिरात दृष्कृत्य केलं. गावात 30 वर्षे वास्तव्य करूनही गावानं आर्थिक बहिष्कार टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. या गावात हिंदूंचा मोर्चा निघाल्यानंतर काही मुस्लीम कुटुंबं गाव सोडून गेल्याची चर्चा आहे. शिवाय बेकरीमधला माल कुणी घेत नसल्याची ही या मुस्लिम कुटुंबीयांची तक्रार आहे. खारी तशीच पडून आहेत, बुरशी लागलीय असं ही ते सांगत आहेत. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांच्या हातचे काम गेले आहे. व्यवसाय ठप्प झाला आहे असं त्याचं म्हणणं आहे.
नक्की वाचा - Dhule News: माजी सैनिक चंदू चव्हाणला मारहाण, आधी लाथ मारली मग धक्का दिला, Video Viral
पौड गावात माथेफिरुनं मंदिरात विटंबना केल्यानंतर गावातल्या हिंदू संघटनांनी मोर्चा काढला. मात्र गावात कुठलीही हिंसा झाली नाही. स्थानिक मुस्लिमांवर कुठलाही बहिष्कार घातला नाही, असा दावा हिंदू संघटनांनी केला आहे. इथं स्थायिक झालेले मुस्लिम कुठेही पळून गेले नाहीत असं ही हिंदू संघटनांचा दावा आहे. गावात मशिदीवर हल्ला झाला नाही, कुठलीही हिंसा झाली नाही असं ही त्यांनी सांगितलं. पौड, पिरंगुट गावांमधली परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. ज्यांनी मंदिरामध्ये विटंबना केली, त्यावर कारवाई व्हायलाच हवी मात्र यानिमित्तानं गावगाड्याची सामाजिक घडी विस्कटायला नको.