देवा राखुंडे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या महिला वाहकास शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील चौफुला याठिकाणी ही घटना घडली. एसटी समोर लावलेली रिक्षा बाजूला करण्यासाठी वाहकाने सांगितले. त्याचा राग त्या रिक्षा चालकाला आला. त्याने त्या रागातून थेट महिला एसटी वाहकास मारहाण केली. यावेळी रस्त्यावरच जोरदार राडा झाला. या प्रकरणी तीन जणांविरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. राज्य परिवहन मंडळाची बस सुपा बाजूकडे वळवण्यासाठी घेऊन जात असताना, एक रिक्षा चालकाने एसटी बस समोर आपली रिक्षा थांबवली. त्यावेळी महिला वाहकाने रिक्षा बाजूला घेण्यात सांगितले. त्याच वेळी दुसऱ्या रिक्षातून दोन अनोळखी व्यक्ती तिथे आले. बाचाबाची झाली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात लोक तिथे जमा झाले होते.
त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करायला सुरूवात केली. शिवाय घाणेरडे हातावरे केले. महिला वाहकांनी या रिक्षा चालकाला प्रतिकार केला. शिव्या देवू नकोस असं त्या त्याला वारंवार सांगत होत्या. तरही तो ऐकत नव्हता. शेवटी त्याने त्या महिला वाहकास मारहाण करण्यास सुरूवा केली. त्यामुळे रस्त्यावरच जोरदार राडा झाला. शिवाय रिक्षा नेताना त्याने त्या महिला वाहकांच्या अंगावरही घालण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या प्रकरणी रिक्षा चालक आणि दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर एसटीच्या महिला चालक आणि वाहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात अशा घटना होवू नये म्हणून एसटी महामंडळाला काही उपाय योजना कराव्या लागणार आहे. विशेष म्हणजे या वेळी बघ्यानी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे होते. सध्या या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.