Pune News : पुण्यातील कात्रज परिसरातून दोन वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करून तिला भीक मागायला लावण्यासाठी नेणाऱ्या एका टोळीचा भारती विद्यापीठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चिमुरडीची तुळजापूरमधून सुखरूप सुटका केली असून पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात एका महिलेचाही समावेश आहे.
25 जुलैच्या रात्री कात्रजमधील वंडर सिटी परिसरात धनसिंग काळे यांच्या झोपडीवजा घरातून त्यांची दोन वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी एक मुलगी झोपेतून गायब झाली होती. रात्री उशिरा मुलगी गायब असल्याचं लक्षात येताच त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करत कात्रज ते पुणे स्टेशनदरम्यानचे तब्बल 140 सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात दुचाकीवर तिघेजण मुलीसह जाताना दिसले. पुढे पुणे स्टेशनच्या फुटेजमध्ये आणखी दोघांची माहिती मिळाली.
नक्की वाचा - अनिलकुमार पवारांची 17 जुलैला बदली, 11 दिवसांनी सोडला पदभार; ईडीला अशी लागली टीप
सर्व आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झाल्यावर पोलिसांचं पथक तिथे रवाना झालं. तुळजापुरातून सुरुवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आली आणि चिमुरडीची सुखरूप सुटका झाली. पुढील चौकशीत उर्वरित दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं.अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुनील भोसले, शंकर पवार, शालुबाई काळे, गणेश पवार आणि मंगल काळे यांचा समावेश आहे. आरोपींनी भीक मागण्यासाठी मुलीचं अपहरण केल्याचं कबूल केलं आहे. पाचही आरोपींना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं असून, 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे अपहरण करून बालकांना भीक मागायला लावणाऱ्या टोळ्या अद्यापही सक्रिय असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत चिमुरडीची सुटका केली, हे नक्कीच कौतुकास्पद आहे.