यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune News: पुण्यातील पर्वती परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचे पाणी करणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 70 वर्षांच्या नराधम आजोबाने आपल्याच 9 वर्षांच्या सख्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून नात्याला कलंक लागला आहे. पीडित मुलीच्या मातेने आपल्या पोटच्या पोरीवरील हा अत्याचार पाहून प्रशासनाकडे एकाच मागणीचा टाहो फोडला आहे, ती म्हणजे, 'माझ्या नराधम बापाला फाशीच द्या'.
चिमुरडीने सांगितला तो भीषण थरार
पीडित मुलीची आई कपड्याच्या दुकानात कामाला असून रात्री जेव्हा ती घरी परतली, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. नऊ वर्षांच्या चिमुरडीच्या अंगावर ओरखडे आणि जखमांचे वण पाहून आईने विचारणा केली. तेव्हा त्या चिमुरडीने रडत सांगितले की, 'आई, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही.
तुम्ही दोघं कामावर गेल्यावर आजोबा मला जबरदस्ती स्वतःकडे खेचायचे'. खाऊचे आमिष दाखवून आणि भीती घालून हा नराधम वारंवार संधी शोधत होता. मंगळवारी संध्याकाळी 7 च्या सुमारास जेव्हा मुलीचा भाऊ झोपलेला होता, तेव्हा पुन्हा हा प्रयत्न झाला.
( नक्की वाचा : Dombivli News: नवऱ्यानं आधी घरातील सिलेंडर लांबवला, आता पत्नीला सांगतोय ‘धंदा कर'; डोंबिवलीतील संतापजनक प्रकार )
नराधम बापाबद्दल लेकीचा तीव्र संताप
आपल्याच वडिलांनी आपल्या मुलीसोबत केलेल्या या कृत्यामुळे पीडित मुलीची आई पूर्णपणे कोलमडली आहे. मीडियाशी बोलताना तिला अश्रू अनावर झाले. तिने संताप व्यक्त करताना म्हटले की, ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं, त्याच बापाने माझ्या काळजाच्या तुकड्यावर नजर टाकली. अशा नराधमाला जगण्याचा कोणताही अधिकार नाही. नात्यातील विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेमुळे एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
न्यायालयात नेमकं काय घडलं?
या प्रकरणी पुणे पोलिसांनी 70 वर्षीय आरोपी अंबादास जाधव याला तातडीने अटक केली असून बुधवारी त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने जेव्हा आरोपीला विचारले की, पोलिसांनी तुला का अटक केली?
तेव्हा त्याने 'एका बाईने अफवा उठवली म्हणून मला अटक केली' असे म्हणत निर्लज्जपणाचा कळस गाठला. मात्र, पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आणि शेजाऱ्यांच्या साक्षीच्या आधारे सखोल तपासासाठी 3 दिवसांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने आरोपीला 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोबाईल जप्त करून होणार पुढील तपास
आरोपी अंबादास जाधव याने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यातून काही धागेदोरे मिळतात का, हे पाहिले जाणार आहे. आरोपीची वैद्यकीय चाचणी (Medical) देखील केली जाणार आहे. पीडित मुलीचे वडील रिक्षाचालक असून त्यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वीच मोबाईल चोरीच्या संशयावरून आरोपीला घराबाहेर काढले होते, कारण त्याचे वर्तन संशयास्पद होते.
या घटनेनंतर पर्वती परिसरात प्रचंड तणाव आणि संतापाचे वातावरण आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांना कायद्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांमुळे किंवा दगडफेकीमुळे तपासात अडथळा येऊ शकतो, त्यामुळे संयम ठेवावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.