राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे हीने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ केला जात होता असा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात आता जी FIR दाखल करण्यात आली आहे, त्यात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वैष्णवी त्या घरात नरक यातना सहन करत होती. शिवाय तिने जाचाला कंटाळून या आधी ही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ऐवढचं नाही तर ज्या वेळी ती गर्भवती होती त्यावेळी तिच्या चारित्र्यावर नवरा शशांक यानेच संशय घेतल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुळशी तालुक्यातील भुकूम येथे 16 मे ला वैष्णवीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला होता. आपल्या मुलीला हुंड्यासाठी छळले जात होते असं तिच्या कुटुंबियानी म्हटले आहे. शिवाय एफआयआर मधून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी वैष्णवीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर कार, चांदीची भांडी घेतली होती. एवढंच नाही तर मोठ्या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर लग्न लावलं होतं. अशी माहिती एफआयआरमध्ये आहे. लग्नानंतर वैष्णवीकडे चांदीच्या भांड्याची मागणी करण्यात आली. त्यावरून सासु लता, नंनंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी तिला शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरू केलं होतं असं एफआयआरमध्ये आहे.
यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी ऑगस्ट 2023 मध्ये गर्भवती राहीली होती. याची माहिती तिने पती शशांक याला दिली. पण त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे बाळ माझे नाही. ते दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे तो तिला म्हणाला. पती शशांक आणि सासरचे लोकांनी तिच्यासोबत भांडण करुन तिला मारहाण केली होती. सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने जेवणातून विष घेतले होते. त्यातून तिने आपलं जीवन संपवण्याचं ठरवलं होतं.अशी धक्कादायक माहिती ही आता समोर आली आहे. तेव्हा तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे तिचा जीव वाचला होता. तिच्यावरती 4 दिवस उपचार सुरू होते. त्याकाळात तिला सासरचे कुणीही भेटण्यासाठी आले नाहीत.
दवाखान्यातून वैष्णवी परत घरी आल्यानंतर पंधरा दिवसातच तिच्याकडे दोन कोटीची मागणी करण्यात आली. जमीन खरेदीसाठी हे पैसे तिच्याकडून मागण्यात आले. ते देत नसल्यामुळे पुन्हा धमकावणे, हाणामार केली जात होती. आता तिचा शवविच्छेदन अहवाल ही समोर आला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन करण्यात आले. डॉ.जयदेव ठाकरे आणि डॉ. ताटिया यांच्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा ही आढळल्या आहेत. शरीरावर रक्त साकाळल्याचे डाग आहेत. त्यामुळे वैष्णवीने आत्महत्या नाही तर तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने आता तपास सुरू आहे.
हगवणे कुटुंबीयांने घरातील लहान सुनेचा अमानुषपणे छळ केल्याचं या माध्यमातून समोर आलं आहे. मात्र अगदी त्याच प्रमाणे काहीसा मोठ्या सुनेचा ही छळ हगवणे कुटुंबीयांनी केल्याचं ही स्पष्ट झालं आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये हगवणेंच्या मोठ्या सुनेने पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्याबाबत गुन्हा ही दाखल केला गेला आहे. सासरे राजेंद्र यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली होती. शिवाय मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं होतं असं तिने म्हटलं आहे. मात्र तेव्हा राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान वैष्णवीच्या मृत्यूनंतर अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र हे फरार आहेत.