Pune News: 13 वर्षाच्या मुलीचा गर्भपात, फलटणमधील डॉक्टरला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

पीडितेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी फलटण येथील एका डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

देवा राखुंडे 

महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि त्यानंतर तिचा बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी फलटण येथील डॉक्टर योगेश हनुमंत नरुटे याला पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्या रुग्णालयाची झाडाझडती घेण्यात आली आहे. शिवाय गर्भपातासाठी वापरलेलं साहित्य ही जप्त करण्यात आलं आहे. 

नेमके प्रकरण काय?
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 48 वर्षीय व्यक्तीने आपल्याच नात्यातील 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली होती. हे प्रकरण दाबण्यासाठी नातेवाईक आणि मध्यस्थांच्या मदतीने पीडितेचा बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यात आला. याप्रकरणी 24 एप्रिल 2026 रोजी मुख्य आरोपी रवींद्र आनंदराव गार्डी याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. मात्र, 28 एप्रिल 2026 रोजी पोलीस कोठडीत असतानाच रवींद्र गार्डी याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Advertisement

नक्की वाचा - Jalna News: नग्न केले, फोटो काढले, व्हिडीओ बनवले! 10 वर्ष शरीरसंबंध, लव्ह जिहादचं हादरवणारं प्रकरण

डॉक्टरवर गंभीर आरोप
या प्रकरणाचा पुढील तपास करत असताना, फलटणमधील डॉक्टर योगेश हनुमंत नरुटे याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिचा बेकायदेशीर गर्भपात केल्याचे समोर आले. डॉक्टरने या घटनेची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक होते, परंतु ती न देता पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गर्भाची विल्हेवाट लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात मध्यस्थी करणारा पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ यालाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

नक्की वाचा - Kalyan News: ना उपचार, ना रुग्णवाहिका! 4 तास तडफडत राहीला, जेलच्या अंधाऱ्या कोठडीत कैद्याचा भयंकर शेवट

रुग्णालयाची झाडाझडती आणि साहित्य जप्त
वडगाव निंबाळकर पोलिसांनी आज डॉक्टर नरुटे याच्या रुग्णालयाची कसून तपासणी केली. या कारवाईत गर्भपातासाठी वापरलेले वैद्यकीय साहित्य आणि रुग्णालयातील काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा शोध घेत आहेत. पीडित मुलगी अवघी 13 वर्षांची असतानाही तिची वैद्यकीय माहिती लपवून गर्भपात करणे आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणे, अशा गंभीर आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे.