Pune News : शेंडीबाबत अजब मागणी; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जाहीर केल्यानंतर भोंदू ऋषिकेश वैद्य म्हणाला...

दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. यावेळी ऋषिकेश वैद्यच्या वकिलांनी अजब मागण्या केल्या आहेत. 

जाहिरात
Read Time: 3 mins

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी

Pune News : नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात याने महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण गाजत असतानाच आपण महादेवाचा अवतार असल्याचं सांगून पुण्यातील एका विवाहित महिलेवर अत्याचार करणार्‍या ऋषिकेश वैद्य या भोंदुबाबाचे बिंग फुटले होते. एका महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो पसार झाला होता. पुणे शहर पोलिसांच्या विशेष पथकांसह मांजरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पिंपरी परिसरातून अटक केली आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी लष्कर न्यायालयात आज सादर केले. दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. यावेळी ऋषिकेश वैद्यच्या वकिलांनी अजब मागण्या केल्या आहेत. 

पुण्यातील कथित अत्याचार प्रकरणात आरोपीला 9 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. दुसऱ्यांदा पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली. तपासासाठी आरोपीचे ५ मोबाइल, व्हिडीओ, फोटो आणि चॅटिंगची माहिती महत्त्वाची असल्याचे पोलिसांनी नमूद केले. ज्या चार चाकी वाहनातून प्रवास घडला ती गाडी जप्त करण्याची गरज आहे. पेनड्राईव आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे. प्रसादामधून गुंगीचं औषध दिल्याचे पीडितेने सांगितले आहे, त्यामुळे गुंगीचं औषध नेमकं कुठून आणलं याचा देखील तपास करणं बाकी आहे. 

Advertisement

त्याची शेंडी कापू नका, वकिलांची मागणी...

दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद ऐकल्यानंतर पुणे लष्कर न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. तुरुंगामध्ये वैद्य याचे केशवपन करू नये आरोपीच्या वकिलांची अजब मागणी केली आहे. न्यायालयीन कोठडीचा आदेश होण्यापूर्वी युक्तिवादामध्ये बचाव पक्षाचे वकील यांनी ऋषिकेश वैद्य हे धर्मगुरू असल्यामुळे त्यांचे केस वपण करण्यात येऊ नये या संदर्भात स्वतंत्र आदेश द्यावा. तुरुंग नियमावलीनुसार धर्मगुरूंना देण्यात येणारी सुविधा ऋषिकेश वैद्य यांनाही देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. शेंडी कापण्यात येऊ नये अशी अजब मागणी आरोपीच्या वकिलांनी केली.

नेमके प्रकरण काय आहे ?

अशोक खरात याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातील विवाहित महिलेने हिंमत करुन हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला. पीडित महिला ही मुळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची सोशल मीडियाद्वारे भोंदू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली. वैद्य हा मुळचा वसई येथील राहणारा आहे. त्याने या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. माझ्या अंगात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची याचे तंत्र तुला शिकवतो, असं सांगितलं. २०२३ मध्ये तो पुण्यात आला. त्याने या महिलेची एका लॉजवर भेट घेतली. तिला त्याने गुंगीचे औषध देऊन मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती असं बोलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने तिला पुन्हा वसईत बोलावले आणि तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता, असा आरोप केला जात आहे. या प्रकरणी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तो मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. वसई आणि पुणे पोलिसांनी ऋषिकेश वैद्य याचा शोध घेत होते. तो पिंपरी परिसरात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. भोंदू बाबा वैद्य यांनी आणखी काही महिलांचं लैंगिक शोषण केलं असल्याची शक्यता आहे. त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आणखी ३ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. परंतू न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.