अविनाश पवार, पुणे:
Pune Rajgurunagar Coaching Class Murder: पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील संस्कार कोचिंग क्लासेसमध्ये लहान मुलांचे भयंकर गँगवॉर पाहायला मिळाले. इयत्ता 10 वीच्या वर्गामध्ये शिक्षक शिकवत असतानाच एका मुलाने त्याच्या क्लासमेटचा गळा चिरला. वर्गातच झालेल्या या चाकू हल्ल्याने एकच खळबळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.
वर्गात चाकूने वार, शिक्षकांसमोर गळा चिरला!
हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थानामुळे ओळख असलेलं राजगुरुनगर हे शहरसध्या वाढत्या हिंसाचारामुळे चर्चेत आहे. आज सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगरमधील एका खाजगी क्लासमध्ये दहावीमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादातून एका विद्यार्थ्याने वर्ग मित्रावर चाकूने हल्ला केला.
Bhandara Crime: एक व्हिडिओ कॉल, 20 लाख लुटले! मनी लाँड्रिंग केल्याचे सांगितले अन्...
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्याला शेजारी राहणाऱ्या एका युवकाने तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.ही घटना समजताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. मृत विद्यार्थी हा एकुलता एक होता, दोन दिवसांपूर्वीच त्याला मारहाणही झाली होती, मात्र याबाबत त्यांना सांगण्यात आले नव्हते. वर्गात हत्या होते शिक्षक काय करतात? आता मी कोणाकडे पाहू असे म्हणत त्यांनी एकच आक्रोश केला.
अल्पवयीन मुलांच्या गँगवॉरने खळबळ...
मागील काही दिवसांपासून या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू होते. याच वादातून आज अल्पवयीन आरोपीने वर्गमित्रावर याच्यावर हल्ला केला. अल्पवयीन आरोपी वर्गामध्ये उशिरा पोहोचला. तो मृत विद्यार्थ्याच्या मागच्या बेंचवर बसला. वर्ग सुरु असतानाच त्याने हल्ला करत थेट गळा चिरला तसेच त्याच्या पोटावरही वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, राजगुरुनगर शहरात अल्पवयीन मुलांमध्ये गँग तयार होत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत. महात्मा गांधी विद्यालय आणि संबंधित खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वारंवार भांडणं, बाचाबाची आणि मारामारीच्या घटना घडत असल्याचंही बोललं जात आहे. अल्पवयीन मुलांमधील किरकोळ वाद थेट चाकूहल्ला आणि मृत्यूपर्यंत पोहोचणं ही गंभीर बाब असून, समाजात मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. आता या प्रकरणात पोलीस कोणती कारवाई करतात आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.