रक्ताचा नमुना कचऱ्यात, ससूनच्या डॉक्टरांचं बिंग असं फुटलं; आयुक्तांकडून धक्कादायक माहिती

अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी ससूनमधील डॉक्टरांशी थेट संपर्क केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

पुणे पोर्शे अपघात प्रकरणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. पुण्यात अल्पवयीन आरोपीने दोघांना धडक दिली. यात दोन निष्पाप तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल सापडलं की नाही, याबाबत सवाल उपस्थित केले जात होते. मात्र पबमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दारू पित असताना दिसत असला तरी रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल का आढळला नाही, यावरुन पुणे पोलीस संशयाच्या घेऱ्यात होते. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. 

अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल करण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ससूनच्या डॉक्टरांनी अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना कचऱ्यात टाकला होता आणि त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीच्या रक्ताचा नमुना फॉरेन्सिक विभागाकडे दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे एचओडी अजय तावरे आणि सीएमओ श्रीहरी हाळनोर यांना अटक करण्यात आली आहे. आज या दोघांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

Advertisement

ससूनमधील डॉक्टरांचं बिंग कसं फुटलं?
ससूनमध्ये रक्ताचा नमुना दिल्यानंतर पुणे पोलिसांनी औंध रुग्णालयातही अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना तपासणीसाठी दिला होता. हा नमुना दुर्घटनेच्या वीस तासांनंतर देण्यात आला होता. औंधमध्ये अल्पवयीन आरोपी आणि त्याचे वडील विशाल अग्रवाल यांची डीएनए चाचणी करण्यात आली, जी मॅच झाली. मात्र ससून रुग्णालयात घेतलेला रक्ताच्या नमुन्याची डीएनए चाचणी आरोपीसोबत मॅच झालेली नाही. यानंतर तावरे आणि हरलोल यांनी रक्ताच्या नमुन्यात अदलाबदल केल्याचं उघडकीस आलं. पुढे पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, दुसऱ्यांदा रक्ताचा नमुना अल्कोहोल तपासण्यासाठी घेण्यात आलेला नाही. तर यामुळे पहिल्या नमुन्यात गोंधळ झाल्याचं समोर आलं. दरम्यान अल्पवयीन आरोपीच्या नावाखाली फॉरेन्सिक विभागाला तपासणीसाठी दिलेला नमुना कोणाचा होता, याचाही युद्धपातळीवर तपास सुरू आहे. 

Advertisement

नक्की वाचा - पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपीच्या ब्लड रिपोर्टबद्दल मोठा खुलासा; ससूनमधील 2 डॉक्टरांना अटक

ससून डॉक्टरांसोबत आरोपीच्या वडिलांचा थेट संबंध
ससूनचे फॉरेन्सिक विभागाचे एचओडी अजय तावरे आणि सीएमओ श्रीहरी हाळनोर यांनी रक्ताचा नमुना बदलला, यासाठी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्यांच्याशी थेट संपर्क केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. यासाठी विशालने त्यांना कसली ऑफर दिली याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.  

Advertisement