Pune Swargate Crime : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुणाट येथील असल्याचं समोर आलं आहे. त्याच्यावर या आधीच शिरूर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं उघड झालं आहे. अद्याप दत्ता गाडे ताब्यात आला नसून पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान या आरोपीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय गाडे हा पुण्यातील एका मोठ्या नेत्याचा कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. गाडे आणि त्या नेत्याचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पहाटेच्या वेळी पुण्यातील वर्दळीचं ठिकाण असलेल्या स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. कोणीच पीडितेच्या मदतीसाठी का आलं नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. दत्तात्रय गाडे हा शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. तो एक सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर शिरूर, शिक्रापूरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जबरी लुटीचे सहा गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे तो वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकीत बसवून त्यांना लुबाडत असल्याचीही माहिती आहे.
शिरूर व स्थानिक गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये दत्तात्रय गाडे याने कर्ज काढून एक चारचाकी कार विकत घेतली होती. या कारमधून तो पुणे- अहिल्यानगर या मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता. दरम्यान, याच महामार्गावर अंगावर जास्त दागिने असलेल्या एकट्या दुकट्या वृद्ध महिलेला लिफ्ट देत असे. त्यांना घरून जेवणाचा डबा घ्यायचा आहे किंवा जवळच्या मार्गाने जाऊ, असे सांगून महामार्गाजवळ आडमार्गे निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेऊन त्या महिलेला तेथेच सोडून तो पलायन करत होता. गुणाट ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित गाडे याची कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. त्याच्या घरात भाऊ, पत्नी आणि लहान मुलंही आहेत. त्याच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीनही आहे. सुरुवातीपासून तो काहीच कामधंदा करीत नाही. मात्र झटपट पैसे कमविण्याच्या मोहात त्याने हे उद्योग केल्याचं समोर आलं आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे याचा बस स्थानकावर नेहमी वावर होता. तो इनशर्ट, पायात स्पोट्स शूज, मास्क अशा वेशात फिरायचा. तो बस स्थानकावरील लोकांना पोलीस असल्याचं भासवायचा, अशी माहिती समोर आली आहे. पीडितेशी ताई म्हणून संवाद साधताना स्वतःची ओळख पोलीस म्हणून करून दिल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.