Pune Kothrud Police Case: पुण्यामध्ये तीन दलित मुलींचा पोलिसांकडून छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मराठवाड्यातील एका पीडित तरुणीने अन्यायाला कंटाळून पुण्यात आश्रय घेतला. ती येथे राहणाऱ्या तीन मैत्रिणींच्या घरी आली असताना, पोलिसांकडून कोणताही वॉरंट न दाखवता अचानक चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून जातीवाचक शब्द वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप मुलींनी केला आहे.
पोलिसांनी प्रेमा पाटील या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस नसतानाही ही चौकशी केली. त्यांना जातिवाचक शेरेबाजी करत अपशब्द वापरण्यात आले. या तक्रारीनंतरही आता एक दिवस उलटून गेला आहे तरी पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या पिडीत मुलींनी तब्बल 15 तास पोलीस आयुक्तालयात ठिय्या मांडला. मात्र त्यांची तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली गेली. याप्रकरणी वंचितचे नेते सुजात आंबेडकर, रोहित पवार यांनीही आयुक्त कार्यालयात पहाटे तीनपर्यंत ठाण मांडले. त्यानंतरही पोलीस प्रशासनाने संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठाम नकार दिला आहे.
कोथरुड पोलिसांवर कुणाचा दबाव? तक्रारीसाठी 3 तरुणींचा 15 तास ठिय्या; प्रकरण तापलं
रोहित पवार यांचा संताप
छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे.