
रेवती हिंगवे, पुणे: एका पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोथरूड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलांनी पोलिसांनी पदाचा गैरवापर, मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळले असून, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका मिसिंग प्रकरणाच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी सहकार्य केल्याचं म्हटलं आहे.
घरगुती हिंसाचारातील एका पिडितेला मदत केल्याच्या रागातून तीन सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. कोथरुड पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले तसेच त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याबाबत श्वेता एसव्ही नावाच्या तरुणाने फेसबुकवर पोस्ट करत संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
नेमकं काय घडलं?
पिडीतेच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार, एका पिडीत महिलेला मदत केल्याच्या कारणातून तीन सामाजिक कार्यकर्त्यांना कोथरुड पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप एका तरुणीने केला आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून एक महिला पुण्यात आली होती. या महिलेला तीन सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या महिलांनी मदतीचा हात दिला तिला स्वावलंबी बनवण्यासाठी कोर्सेसचीही सोय केली.
मात्र या पिडीतेच्या नातेवाईकांपैकी एकजण संभाजीनगरमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी आहे. या अधिकाऱ्याने कोथरुड पोलिसांच्या मदतीने या सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या मुलींना ताब्यात घेतले अन् मारहाण केली. कोथरुड पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस प्रेमा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोथरुडमध्ये राहणाऱ्या तीन महिला सामाजिक कार्यकर्त्यांच्या रुमवर जाऊन झडती घेतली. तसेच त्यांना एका छोट्या खोलीत नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
Nashik Crime : बाकावर बसण्यावरुन वाद; क्लासच्या आवारातच दहावीतील यशराजची निघृण हत्या
तूम्ही महार-मांगाचे आहात मगं असेच वागाल? तुम्ही सगळे LGBT आहात का? अशी भाषा पोलिसांनी वापरली. शनिवारी पाच तास या मुली पोलिसांच्या ताब्यात होत्या. रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले, असा आरोप पिडीत मुलींच्या मैत्रिणीने केला आहे. यासंबंधीचा व्हिडिओही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे. या मुली दलित आहेत म्हणून त्यांना मारहाण करण्यात आली, असा आरोप तिने केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world