Pune News : आई की सैतान? 6 वर्षांच्या मुलाचा बादलीत तोंड दाबून जीव घेतला; पुण्यातून बीडला मृतदेह नेला आणि...

Pune News : पुण्यात 6 वर्षांच्या चिमुरड्याची त्याच्याच आईने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली.

जाहिरात
Read Time: 3 mins
Pune News : हा संपूर्ण प्रकार इतका भयंकर आहे की... (प्रतिकात्मक फोटो)
पुणे:

सुरज कसबे, प्रतिनिधी

Pune News : पुण्यात नातेसंबंधाना हादरा देणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघड झाली आहे.प्रेमसंबंधांत अडथळा ठरतो म्हणून केवळ 6 वर्षांच्या चिमुरड्याची त्याच्याच आईने प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. हा संपूर्ण प्रकार इतका भयंकर आहे की ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील.

काय आहे प्रकरण?

ही हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडली आहे. 27 वर्षांची आई बसरिन मेहबूब शेख हिचे आरोपी राम विनायक कजेवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. हे दोघेही गेल्या 4 महिन्यांपासून कुरुळी परिसरात एकत्र राहत होते. मात्र, या दोघांच्या प्रेमसंबंधात बसरिनचा 6 वर्षांचा मुलगा आवेज हा अडथळा ठरत होता. याच कारणावरून 4 एप्रिल रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास आईने प्रियकराच्या मदतीने आपल्याच मुलाचा जीव घेण्याचे ठरवले.

Advertisement

आरोपींनी आवेजची हत्या अत्यंत क्रूरपणे केली. त्यांनी आधी मुलाचे डोके बाथरूममधील पाण्याच्या बादलीत बुडवले आणि त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर व जमिनीवर जोरात आपटले. या हल्ल्यात चिमुरड्या आवेजचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक कृत्यानंतर आरोपींनी या हत्येला नैसर्गिक मृत्यूचा बनाव देण्याचे कारस्थान रचले. कोणालाही संशय येऊ नये म्हणून मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचे सांगण्यात आले.

( नक्की वाचा : Nashik News : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाजची सक्ती आणि बीफ खाण्याचा दबाव )

मृतदेह घेऊन महिला माहेरी

पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी बसरिनने एक योजना आखली. ती आवेजचा मृतदेह घेऊन थेट आपल्या माहेरी म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये गेली. तिथे तिने नातेवाईकांना मुलाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले आणि घाईघाईने अंत्यविधी उरकण्याची तयारी केली. तिने मुलाच्या वडिलांच्या घरच्यांनाही अंत्यविधीसाठी बोलावून घेतले. मात्र, नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते.

...आणि बिंग फुटले

अंत्यविधीसाठी आलेल्या आवेजच्या आजोबांना नातवाचा मृतदेह पाहून संशय आला. मुलाच्या शरीरावरील खुणा पाहून त्यांना काहीतरी अघटित घडल्याची जाणीव झाली. त्यांनी तातडीने परळी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात आवेजचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आणि आईचे बिंग फुटले.

( नक्की वाचा : Solapur News : 14 वर्षांची नवरी, 19 वर्षांचा नवरा, 4 महिन्यातच सारा खेळ संपला! प्रकरण वाचून अंगावर येईल काटा )

संसारातील दुरावा ठरला मुलाचा काळ

बसरिन आणि मेहबूब यांचा विवाह 10 वर्षांपूर्वी झाला होता आणि त्यांना 3 मुले आहेत. मात्र, गेल्या 4 वर्षांपासून त्यांच्या संसारात वादाची ठिणगी पडली होती. यादरम्यान बसरिन ही पतीचा मित्र असलेल्या रामच्या संपर्कात आली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. बसरिन पतीपासून वेगळी राहू लागली. तिची दोन मुले वडिलांकडे होती, तर आवेज तिच्यासोबत राहत होता. सध्या पोलिसांनी आरोपी आईला बेड्या ठोकल्या आहेत, तर तिचा प्रियकर राम अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
 

Advertisement
Topics mentioned in this article