- अहमदाबादमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखेतील आरबीआयच्या तिजोरीतून ८.७० कोटी रुपयांच्या चोरीचा प्रकार उघड झाला आहे
- चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने ९८ दिवस ऑफिसमध्ये येत चोरी लपवली आणि नंतर मेडिकल लीव्ह घेऊन फरार झाला
- आरोपीने चोरी केलेल्या पैशातून घर, गाडी घेतली आणि महिला सहकाऱ्याला घरासाठी २३ लाख रुपये दिले होते
Ahmedabad RBI Chest Theft Case: बँकेत आपला पैसा सुरक्षित राहील या विचाराने लोक तिथे आपला पैसे जमा करतात. पण जेव्हा बँकेचीच तिजोरी लुटली जाते, तेव्हा काय करायचं? तेही कोणत्या साध्यासुध्या बँकेचा नाही, तर थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) तिजोरी. असाच काहीसा धक्कादायक प्रकार गुजरातच्या अहमदाबाद शहरातून समोर आला आहे, जिथे चक्क आरबीआयच्या तिजोरीवरच डल्ला मारण्यात आला आहे. ही चोरी बँक ऑफ बडोदाच्या एका शाखेत असलेल्या आरबीआयच्या तिजोरीतून झाली आहे. याच बँकेच्या एका कर्मचाऱ्याने 8.70 कोटी रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 13 जानेवारी रोजी तो दोन मजुरांसह साफसफाईसाठी आरबीआयच्या तिजोरीत गेला आणि तिथून कचऱ्याच्या डब्यात कोट्यवधी रुपयांच्या नोटा भरून बँकेबाहेर पडला.
कोणाला संशय येऊ नये म्हणून ऑफिसला येत राहिला
चोरी करणारा हा कर्मचारी इतका हुशार होता की, कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने इतकी मोठी चोरी केल्यानंतरही ऑफिसमध्ये येणे सुरू ठेवले. त्याला माहीत होते की सीसीटीव्ही (CCTV) फुटेज 90 दिवसांनंतर डिलीट होते. म्हणूनच चोरी केल्यानंतर तो 20 एप्रिलपर्यंत म्हणजेच सुमारे 98 दिवस ऑफिसला येत राहिला. त्यानंतर मेडिकल लीव्ह (आजारी असल्याचे कारण) काढून मोठ्या सुटीचा अर्ज करून तो फरार झाला.
(नक्की वाचा : Nashik Crime: पशूबळी, प्रसादात दारू अन् बरंच काही! सोलापूरच्या दोघांना लुटले, नव्या भोंदूबाबामुळे नाशिक चर्चेत)
अशी उघड झाली त्याची पोलखोल
चोरीच्या पैशातून त्याने घर-गाडी खरेदी केली. एका महिला सहकाऱ्यालाही घर घेण्यासाठी 23 लाख रुपये दिले. काही पैसे शेअर मार्केटमध्येही गुंतवले. यादरम्यान तिजोरीतील रोख रकमेची आरबीआयकडून तपासणी करण्यात आली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीची संपूर्ण घटना समोर आली. एफआयआर (FIR) नोंदवून पोलिसांनी तपास केला असता आरोपीने मनालीमध्ये पळ काढल्याचे आढळले.
Photo Credit: Echion
4 कोटी खर्च केले, पोलिसांनी ठोकल्या बेड्यापोलिसांनी छापेमारी केली तेव्हा घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीत 2 कोटी 20 लाख रुपयांची रोकड सापडली. पोलिसांनी पैसे जप्त करून 22 मे रोजी आरोपीला अटक केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. आरोपीनं सांगितलं की, मागील 15 वर्षांपासून बँकेत काम करत होता आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी त्याने ही चोरी केली होती. चोरी केलेल्या रकमेतील त्याने 4 कोटी रुपये खर्च केले. दरम्यान काही रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली असून उर्वरित रकमेबाबत तपास सुरू आहे. आरोपीची पत्नी रेल्वे पोलिसात कॉन्स्टेबल आहे. या चोरीत तिचा काही सहभाग आहे का? याचाही तपास केला जात आहे.