जाहिरात

Nashik Crime: पशूबळी, प्रसादात दारू अन् बरंच काही! सोलापूरच्या दोघांना लुटले, नव्या भोंदूबाबामुळे नाशिक चर्चेत

Nashik News: अघोरी पूजा, पशूंचा बळी आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक व शोषण केल्याप्रकरणी या भोंदूबाबा कमलेश शिवकुमार अधिकारीविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Crime: पशूबळी, प्रसादात दारू अन् बरंच काही! सोलापूरच्या दोघांना लुटले, नव्या भोंदूबाबामुळे नाशिक चर्चेत

NashikCrime News: भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच, नाशिकमध्ये आणखी एका ढोंगी भोंदूबाबाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. दैवी तोडगे, अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली निष्पाप लोकांची फसवणूक व शारीरिक-मानसिक शोषण करणाऱ्या भोंदू कमलेश शिवकुमार अधिकारी याच्याविरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळे हा गुन्हा दाखल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सोलापूरच्या दोन भावांना लुटले

या भोंदूबाबाच्या जाळ्यात सोलापूरचे दोन भाऊ अडकले होते. बाबाने या दोन्ही भावांच्या पाठीमागे 'मृत्यूयोग' लागला असल्याची भीती त्यांना दाखवली. हा मृत्यूयोग टळावा म्हणून आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी अघोरी पूजा करावी लागेल, असे सांगून बाबाने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले. 

(नक्की वाचा-  Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)

उज्जैनच्या स्मशानभूमीत अघोरी पूजा आणि पशूंचा बळी

भोंदू कमलेश अधिकारी याच्यावर अत्यंत गंभीर आणि अंगावर काटा आणणारे आरोप केले आहेत.  बाबाने पीडितांना मध्य प्रदेशातील उज्जैन येथे नेऊन तिथल्या स्मशानभूमीत अघोरी पूजा केली. दैवी उपचारांच्या नावाखाली विविध प्राण्यांचा बळी देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, या पूजेनंतर बाबा भाविकांना 'प्रसाद' म्हणून चक्क दारू देत असे, असाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

2 एकर जमीन हडपली 

केवळ पैशांवरच हा भोंदूबाबा थांबला नाही, तर स्वतःचा मठ बांधण्याच्या बहाण्याने त्याने पीडितांची तब्बल 2 एकर जमीन परस्पर स्वतःच्या नावावर करून घेतली. विशेष म्हणजे पीडितांना भोंदूबाबाचा युट्युब चॅनल पाहून त्याला संपर्क साधला होता. 

(नक्की वाचा- Virat vs Head: कोहलीसोबतच्या वादानंतर हेडच्या पत्नीसोबत नको ते घडलं; जेसिका हेडने व्यक्त केली नाराजी)

'अंनिस'च्या पुढाकाराने गुन्हा दाखल

आपली फसवणूक आणि शोषण झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला. 'अंनिस'च्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पुढाकार घेत पीडितांना धीर दिला आणि पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. अंनिसच्या कायदेशीर प्रयत्नांनंतर अखेर इंदिरानगर पोलिसांनी या भोंदूबावाविरुद्ध जादूटोणाविरोधी कायदा व फसवणुकीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. इंदिरानगर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून, बाबाच्या जाळ्यात आणखी किती लोक अडकले आहेत, याचा शोध घेत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com