Pune Crime News : पुण्यात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ‘कॉन्फरन्स कॉल' केल्याचं भासवत कोट्यवधी रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात एका निवृत्त बँक अधिकाऱ्यासोबत हा प्रकार घडला आहे. या निवृत्त बँक अधिकाऱ्यासोबत बनावटी केंद्रीय गृहमंत्र्यासोबत कॉन्फरन्स कॉल करण्यात आला. या कॉन्फरन्स कॉलमध्ये एका गोपनीय मिशनची तयारी करण्यात आली. याबदल्यात पुण्याच्या निवृत्त बँक अधिकाऱ्याला 38 कोटींचं आमिष दाखविण्यात आले. मात्र प्रत्यक्षात हा सापळा होता. निवृत्त बँक अधिकाऱ्याला या सर्व बनावटी प्रकरणात चार कोटींचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
या प्रकरणी निवृत्त बँक कर्मचारी, 53 वर्षीय व्यक्तीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पर्वती पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या फसवणुकीच्या प्रकरणात शुभम सनील प्रभाळे, सुनील बबनराव प्रभाळे, ओंकार सुनील प्रभाळे, प्रशांत राजेंद्र प्रभाळे आणि भाग्यश्री सुनील प्रभाळे या पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार 2019 पासून सुरू होता. रॉचं मिशन पूर्ण केल्यानंतर सरकारकडून 38 कोटींचं बक्षीस मिळणार असल्याचं आमिष निवृत्त बँक अधिकाऱ्याला दाखविण्यात आलं. मात्र हे बक्षीस मिळवण्यासाठी प्रोसेसिंग फी, वकिलांची फी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटवस्तू देणे गरजेचे असल्याचं सांगितलं.
यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यासोबत कॉन्फरन्स कॉल केल्याचं भासवलं. या सर्व बनावट संवादावर विश्वास ठेवून बँक कर्मचाऱ्याने गेल्या चार वर्षात तब्बल 4 कोटींचा व्यवहार केला. मात्र या सगळ्या प्रकारात फसवणूक झाल्याचं लक्षात येताच निवृत्त बँक कर्मचाऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी आता पोलिसांनी हा गुन्हा आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग केला असून पुढील तपास सुरू आहे.