सुरज कसबे, प्रतिनिधी
देशातील प्रमुख शहरांमध्ये बेकायदेशीरपणे घुसलेल्या बांगलादेशी तसंच रोहिंग्याचा प्रश्न हा कायम चर्चेत असतो. मुंबईतील सर्व बेकायदेशीर बांगलादेशींना हुसकावून लावण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांची ही घोषणा ताजी असतानाच पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. पुणे जवळच्या देहू रोड परिसरात रोहिंग्यानं स्वत:चं घर बांधल्याचा प्रकार उघड झाला आहे.
काय आहे प्रकरण?
सामान्य व्यक्तींना स्वत:चं घर बांधण्याचं स्वप्न हे दिवसोंदिवस महाग होत चाललंय. त्याचबरोबर आधारकार्ड आणि अन्य आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी बरेच हेलापाटे त्यांना मारावे लागतात. पण, पुण्यात बेकायदेशीरपणे घुसलेल्या रोहिंग्यानं हे दोन्ही जमवलंय.
मुजम्मिल मोहम्मद अमीन खान असं या म्यानमारच्या रोहिंग्याचं नाव आहे. त्यानं देहूरोड परिसरामध्ये स्वत:चं घर बांधलंय. फक्त 80 हजारांमध्ये त्यानं हे घर बांधलं. मुजम्मिलनं भिवंडीतून अवघ्या 500 रुपयांत बनावट आधार कार्ड मिळवलं.पत्नीसाठीही बनावट आधारकार्ड तयार करुन घेतलं. पत्नीसाठीही बनावट आधारकार्ड तयार करुन घेतलं. स्वतःसाठी आणि पत्नीसाठी पासपोर्टही मिळवला.
( नक्की वाचा : Syria War : 13 वर्षांमध्ये जमलं नाही ते 13 दिवसात कसं झालं? सीरियातील सत्तापालटाची Inside Story )
मुजम्मिलनं डिसेंबर 2012 मध्ये म्यानमार सोडलं. बांगलादेशातल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये त्याच्या हाती काही लागलं नाही. तो 2013 साली बेकायदेशीर मार्गाने पश्चिम बंगालमधली आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पत्नी आणि मुलासह भारतात घुसला. कोलकात्याला मनासारखं काम न मिळाल्यानं मुजम्मिल पुण्यात आला. तळेगाव एमआयडीसीमध्ये एका कंपनीत त्यानं नोकरी केली. त्यानंतर त्यानं खेळण्यांचा आणि सुपारीचा व्यवसाय केला. म्यानमार आणि बांगलादेशमधून आणखी रोहिंग्यांना भारतात यायला मुजम्मिलनं मदत केल्याचा संशय आहे. तब्बल दहा वर्षं मुजम्मिल बिनदिक्कतपणे देहूमध्ये राहतोय.
जुलै 2024 मध्ये दहशतवाद विरोधी पथकानं मुज्जमिल आणि आणखी एक रोहिंग्या सोहिद्दुल शेखला ताब्यात घेतलंय. त्या दोघांकडून सेल फोन, सिम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, बांगलादेशी चलन, पासपोर्ट “मौलाना कोर्सचं” प्रमाणपत्र जप्त करण्यात आलं आहे.
( नक्की वाचा : मंदिर बंद, खाती गोठावली! 'इस्कॉन' वर बांगलादेश सरकारचा इतका राग का आहे? )
रोहिंग्या मुस्लिम हा जगातला सगळ्यात मोठा राज्य नसलेला वांशिक समूह मानला जातो म्यानमारमध्ये त्यांच्या वसाहती आहेत 1982 च्या नागरिकत्व कायद्यानुसार, म्यानमार सरकारने केवळ 40,000 रोहिंग्यांना नागरिक म्हणून मान्यता दिली. बाकीचे रोहिंगे मुस्लीम "बेकायदेशीर बंगाली" म्हणून राहिले. म्यानमारमध्ये रोहिंग्यांविरोधात मोठा हिंसाचार उसळल्यानंतर 2017 पासून रोहिंग्यांचं म्यानमारमधून स्थलांतर सुरू झालं. रोहिंग्यांनी मोठ्या प्रमाणात बांगलादेशात आश्रय घेतला भारतात सुमारे 16,000 UNHCR-प्रमाणित रोहिंग्या निर्वासित आहेत मात्र भारतात अवैधरित्या राहणाऱ्या रोहिंग्यांची संख्या 50 हजारांच्या पुढे असल्याचा अंदाज आहे.
देहूरोडमधलं हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मुजम्मिल आणि शेखसह त्याच्या कुटुंबीयांना जामिनावर सोडण्यात आलंय. मात्र या निमित्तानं आपली यंत्रणा किती ढिसाळ आहे आणि भ्रष्टाचारानं पोखरली गेलीय, हे पुन्हा एकदा समोर आलंय.