राहुल तपासे, प्रतिनिधी
Sahyadri Express Robbery: कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या सह्याद्री एक्सप्रेसवर मध्यरात्रीच्या सुमारास थरारक दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. कराड तालुक्यातील शेणोली रेल्वे स्टेशन परिसरात दरोडेखोरांनी सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून चालती एक्स्प्रेस रोखली आणि प्रवाशांची लूटमार केली. या धाडसी चोरीमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
सिग्नल यंत्रणेशी छेडछाड आणि...
मिळालेल्या माहितीनुसार, सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूरवरून पुण्याकडे निघाली होती. मध्यरात्री 12 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास रेल्वे मिरज स्थानकावरून सुटली.
कराड तालुक्यातील शेणोली गावाच्या हद्दीत रात्री अडीचच्या सुमारास एक्स्प्रेस पोहोचली असता, दरोडेखोरांनी आधीच रेल्वेच्या आऊट सिग्नलमध्ये तांत्रिक छेडछाड करून तो बंद पाडला होता. सिग्नल लाल झाल्यामुळे चालकाने गाडी थांबवली आणि याच संधीचा फायदा दरोडेखोरांनी घेतला.
( नक्की वाचा : नाशिकची 'ती' बडी कंपनी 'कॉर्पोरेट जिहाद' चा अड्डा ! मशिदीत ट्रेनिंग ते ऑफिसमध्ये बीफ, वाचा हादरवणारी माहिती )
एस-3 बोगीतील प्रवाशांना बनवले टार्गेट
रेल्वे निर्जन स्थळी थांबताच दरोडेखोरांनी जनरल बोगी क्रमांक एस-3 कडे धाव घेतली. गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना काही समजायच्या आतच खिडक्यांमधून हात घालून लूटमार सुरू झाली. दरोडेखोरांनी दोन प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन आणि दोन महागडे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेले. प्रवाशांनी आरडाओरडा करेपर्यंत अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पसार झाले होते.
पोलिसांकडून तपास सुरू मात्र आरोपी अद्याप फरार
घटनेची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी डॉग स्क्वॉडला पाचारण केले असून रेल्वे मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तांत्रिक छेडछाड करून दरोडा टाकण्याची ही पद्धत पाहता, यामध्ये सराईत गुन्हेगारांची टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, घटनेला काही तास उलटूनही अद्याप आरोपींचा कोणताही सुगावा लागलेला नाही.
प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत छेडछाड करून अशा प्रकारे दरोडा टाकल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. रेल्वे प्रशासनासमोर हे मोठे आव्हान उभे राहिले असून रात्रीच्या वेळी रेल्वे मार्गावर गस्त वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world