निनाद करमरकर
सैफ अली खान याच्यावर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. पण सैफच्या घरी हा हल्लेखोर इतक्या सहज पणे कसा घुसला? तेवढ्याच सहजतेने हल्लाकरून तो तिथून कसा बाहेर पडला? या सारखे अनेक प्रश्न मुंबई पोलिसांसह सर्वांनाच पडले होते. जोपर्यंत हा हल्लेखोर पकडला जात नाही तोपर्यंत या प्रश्नांची उत्तर मिळणार नव्हती. अखेर मुंबई पोलिसांनी ठाण्यातून हल्लेखोराला अटक केली आहे. मोहम्मद शरीफूल इस्लाम शहजाद असं त्याचं नाव आहे. त्याची चौकशी केल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. पण तो इतक्या सहज पणे सैफच्या घरात कसा घुसला याचे ही उत्तर आता त्याच्या चौकशीतून मिळाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सैफ अली खानच्या घरी काही महिन्यांपूर्वी एक पार्टी आयोजित करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी सैफ अली खानने एक खाजगी हाउसकीपिंग एजन्सी नेमली होती. याच एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शहजाद याने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळेस त्याने सैफच्या घराची पाहणी केली होती. ही बाब त्याच्या चौकशीतून समोर आली आहे. तो सैफच्या घरी गेल्यानंतर त्याने संपुर्ण घराची रेकी केली होती. शिवाय त्याच वेळी सैफच्या घरी चोरी करण्याचा प्लॅन त्याने आखला होता.
त्यासाठी त्याने सैफच्या घराचा कोपरा अन् कोपरा पाहून घेतला होता. घरात कसे घुसायचे कुठून घुसायचे हे त्याने याच वेळी पाहून घेतले होते असं पोलिस चौकशीत समोर आले आहे. आरोपी मोहम्मद शहजाद याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने आपण हाउसकीपिंगच्या माध्यमातून सैफच्या घरात हल्ला करण्या आधी प्रवेश घेतला होता. त्याच वेळी सर्व गोष्टी पाहून घेतल्या होत्या असंही त्याने चौकशी दरम्यान सांगितले होते.
त्याने चौकशीत सांगितलेल्या गोष्टी पडताळून पाहाण्यासाठी मुंबई पोलिस आता त्याला सैफ अली खानच्या घरी आणि इमारतीच्या परिसरात घेवून जाणार आहेत. त्यानं नेमका सैफ अली खानच्या घरात प्रवेश कसा केला? हल्ला कसा केला? या सगळ्याचं रिक्रिएशन पोलिसांच्या माध्यमातून केलं जाणार असल्याचीही माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसाना या केसचा गुंता सोडवण्यास मदत होणार आहे. सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी हल्ला करण्यात आला होता. त्यात त्याच्यावर सहा वार करण्यात आले होते. त्यानंतर सैफला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.