सूरज कसबे
अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अजित पवारांना धक्यावर धक्के दिले होते. मात्र आता अजित पवार त्याची परतफेड करण्याच्या तयारीत दिसत आहेत. अजित पवारांचे शिलेदार असलेले माजी आमदार विलास लांडे आणि शहराध्यक्ष राहिलेले अजित गव्हाणे आपल्या 20 नगरसेवकांसह पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. तसे संकेत त्यांनी दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
पिंपरी चिंचवड शहर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधान सभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अजित पवारांचे पिंपरी चिंचवड शहरातील मोहरे अचूक हेरले होते. भोसरी विधानसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लावला होता. मात्र आता पुन्हा अजित पवारांनी आपला ढासळलेला बालेकिल्ला मजबूत करायला सुरुवात केली आहे. त्याची सुरुवात ही भोसरी विधानसभा मतदार संघातून होत आहे. अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांची साथ देणारे विलास लांडे आणि अजित गव्हाणे आगामी पालिका निवडणुकीत पुन्हा अजित पवारांच्या गोटात येण्याच्या तयारीत आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी विलास लांडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया दिली आहे. विलास लांडे हे शहरातील जेष्ठ नेते असून ते कोणत्या अधिकृत पक्षाचे सदस्य आहेत हे सांगणं अवघड आहे. असा टोला त्यांनी लगावला आहे. अजित गव्हाणे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभेला उमेदवारी दिली होती. त्यांनी पक्ष प्रवेशाबाबत अजून कोणतही प्रतिक्रीया दिलेली नाही. ज्या दिड लाख लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवत त्यांना मतदान केलं त्यांचा ते विश्वास घात करणार नाहीत. ते पक्षातच आहेत. या लोकांना विश्वास तोडून अजित गव्हाणे अजित पवारां सोबत जातील असं आम्हाला वाटत नाही असं ही तुषार कामठे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान विलास लांडे यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या आयुष्यात काही बदल घडत असतो. आपली कामं व्हावीत, असं त्यांना वाटतं असतं. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर बोललं उचित राहणार नाही. त्यांना पक्षात घ्यायचं की नाही हा अजित पवारांचा निर्णय आहे, असं ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित गव्हाणे आणि विलास लांडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला साथ देण्याचं ठरवलं आहे. त्याचा थेट फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शहरात होवू शकतो अशी चर्चा आहे. यातून विधानसभेचा वचपा अजित पवार आता महापालिका निवडणूकीत काढत आहेत असं बोललं जातं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world