शरद सातपुते, प्रतिनिधी
वैशाली हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडालेली असताना सांगलीत एका गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवती विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सासरच्या मंडळींकडून धर्मांतरणासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी पतीसह सासू-सासरे,या तिघांना अटक देखील केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
ऋतुजा सुकुमार राजगे,वय 27 ,असं विवाहित तरुणीचे नाव आहे.6 जून रोजी ऋतुजाने तिच्या सासरच्या घरी गळफास घेऊन या आत्महत्या केली आहे. दरम्यान, सासरच्या मंडळींकडून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप ऋतुजाच्या वडिलांकडून करण्यात आला आहे.
या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सुरेश राजगे आणि अलका राजगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांनाही कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे.सुकुमार राजगे कुटुंबाकडून आपल्या मुलीवर धर्मांतर करण्यासाठी वारंवार सक्ती करण्यात येत होती,या छळाला कंटाळूनच तिने आत्महत्याच पाऊल उचलल्याचा आरोप मृत ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
( नक्की वाचा : 'भारतीय क्रिकेटपटूचे वडील घेत होते धर्मांतराचे कार्यक्रम', क्लबनं केली खेळाडूवर कारवाई )
लग्नापूर्वी कल्पना नव्हती....
याबाबत माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ऋतुजा आणि सुकूमार यांचे 2021 साली लग्न झाले होते. ऋतुजाच्या कुटुंबीयांना मुलीच्या सासरची मंडळी ही ख्रिश्चन आहेत, याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. आम्हाला लग्नानंतर हा प्रकार समजला, अशी माहिती ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सुकुमार राजगे कुटुंबीयांनी फादरच्या सांगण्यानुसार मुलीला धर्मांतर कर, ख्रिश्चन हो असं सांगत छळ करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी वारंवार ऋतुजावर दबाव टाकला, तिला त्रास दिला. ती गर्भवती असताना मुलावर ख्रिश्चन धर्माप्रमाणे गर्भसंस्कार कर असा दबाव टाकण्यात आला. हा सर्व छळ असहय्य झाल्यानंच ऋतुजानं हे टोकाचं पाऊल उचललं, अशी माहिती तिचे वडील चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना दिली आहे.