प्रतिनिधी, रॉबिन डेव्हिड
सांगली जिल्ह्यातील कवलापूर गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंधश्रद्धेला बळी पडलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी एका जिवंत बोकडाचे मागील दोन्ही पाय दोरीने बांधून त्याला झाडाच्या फांदीला उलटं लटकवण्याचा क्रूर प्रकार उघडकीस आला.
गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या दर्श सोमवती अमावस्येच्या दिवशी हा आघोरी प्रकार करण्यात आला होता. आठवडाभर हे बोकड त्याच अवस्थेत राहिल्यामुळे या बोकडाचा तडफडून मृत्यू झाला आहे. ही घटना कवलापूर येथील स्थानिक शिवाजीराव पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कळवली. यानंतर तातडीने अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात, फारुख गवंडी यांनी जाऊन या घटनेची पाहणी केली.
यापूर्वी ही कवलापूरमध्ये गेल्या महिन्यात येथील रसूलवाडी रोडवर असाच झाडाला बोकड उलटा टांगून अघोरी प्रकार करण्यात आला होता. जिवंत बोकडाला झाडाला उलटं टांगून अघोरी पद्धतीने बळी देणे. ही अत्यंत अमानवी, अघोरी प्रथा आहे, असे कृत्य करणाऱ्यांवर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार आणि प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी, डॉ. संजय निटवे यांनी केली आहे.