जाहिरात

वाल्मिक कराड गँगची तुरुंगात दहशत, एकाचा हात उखडला; संतोष देशमुख करण्याची धमकी, कथित कॉल रेकॉर्डिंगने खळबळ

कैद्याला प्रचंड मारहाण, हात उखडून काढला, हाताचं हाड बाहेर आल्याचं या कॉल रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं आहे.

वाल्मिक कराड गँगची तुरुंगात दहशत, एकाचा हात उखडला; संतोष देशमुख करण्याची धमकी, कथित कॉल रेकॉर्डिंगने खळबळ

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News : बीड जिल्हा कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या टोळीने मारहाण केल्याचा दावा कारागृहातील एका कैद्याने केला आहे. याबाबतचं कथित कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. अजहर अब्दुल पठाण असं मारहाण झालेल्या कैद्याचं नाव असल्याचं कॉल रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं आहे. यामध्ये त्याने सुदर्शन घुले, प्रतीक घुले, शंकर मधुकर शेप यांनी मला मारहाण केली, माझा हात उखडून काढल्याचा आरोप केला आहे. हात उखडल्यामुळे हाड बाहेर आल्याचंही कैद्याने व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं आहे.

बीड जिल्हा कारागृहात नेमकं काय सुरू आहे? 

धक्कादायक बाब म्हणजे या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमध्ये मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान या कॉल रेकॉर्डिंगमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांच्याकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे बीड जिल्हा कारागृहात काय सुरू असा सवाल उपस्थित होत आहे. दुसरीकडे कारागृह प्रशासनाने मात्र असा कोणताही प्रकार झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कारागृहात शेफ नावाच्या कैद्याबरोबर पठाण याचे शाब्दिक वाद झाले होते. त्याला कुठलीही मारहाण झाली नाही असे त्याने आमच्याकडे लेखी म्हणणे दिले असल्याचे देखील कारागृह प्रशासनाच्या वतीने म्हटलं आहे. दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी बीड जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी केली आहे. 

नक्की वाचा - Pune News : तब्बल 27 तास तरुणाचा छळ; बापाच्या सतर्कतेमुळे मोठा बनाव उघड, नागरिकांना अलर्ट करणारं पुणे प्रकरण

कॉल रेकॉर्डिंगमध्ये धक्कादायक दावे...

पीडित कैद्याने कॉल रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं, तुरुंगातील पोलीस माझं ऐकत नाहीत. घुले पोलिसांना पैसे पुरवतो, त्यामुळे ते मला न्याय देत नाहीत. कारागृहाच्या अधीक्षकांना याबाबत सांगितलं. मात्र तरीही त्यांनी कारवाई केली नाही. यापूर्वी गायकवाड नावाचे अधीक्षक होते. ते चांगले होते. मात्र त्यांची बदली घडवून आणण्यात आली. तुझं तुरुंग बदलवून टाकू असं म्हणत मला तुरुंगात धमकी दिली जात आहे.  माझ्या घराच्या लोकांना फोन करून धमक्या देत आहेत. आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी दिली. मी कोर्टाला सांगेन असं म्हटलं तरीही त्यांना कुणाची भीती नाही. कोणाला सांगायचं ते सांग आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही. पीडित कैद्याने फोनवर बोलताना सांगितलं की, मला मारहाण करतानाचं सर्व दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com