राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
मराठा समाजाची प्रगती व्हावी. या समाजातील गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दरवाजे बंद होऊ नये यासाठी राज्य सरकारनं सारथी योजना सुरु केली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेच्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा विद्यार्थ्यांना सरकारकडून आर्थिक मदत केली जाते. 'सारथी' संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार खासगी शिक्षण संस्थेचे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क ‘सारथी' मार्फत देण्यात येते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सारथी अनुदान घोटाळा?
राज्य सरकारच्या या कल्याणकारी योजनेत पुण्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पुण्यातील खासगी कोचिंग क्लासेसनं विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये बनावट नोंदी करून शासकीय निधीची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
या बनावट नोंदीसाठी टेलिग्रामवर एक ग्रुप तयार करण्यात आला आहे.तपासणीच्या वेळी विशिष्ट खुणा करून मुलांना बोलावले जाते डबल आयडीद्वारे फसवणूक केली जात आहे.
सारथीने शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी 12 कोचिंग क्लासेसना नियुक्त केले होते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची 75% अट पूर्ण करण्यासाठी खासगी कोचिंग क्लासेसने एका विद्यार्थ्याच्या नावावर दोन बायोमेट्रिक आयडी तयार केले आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची बनावट नोंद दाखवून अनुदानाचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि वकील अशोक बेडे यांनी हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या घोटाळ्यात सारथीच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. सारथीमार्फत नेमलेल्या अधिकाऱ्यांनी कोचिंग क्लासेसची योग्य तपासणी केली नाही. त्यामुळे हे प्रकार घडत आहेत, असा आरोप बेडे यांनी केला आहे.
( नक्की वाचा : 30-30 Scam : पोत्यानं पैसे देणाऱ्या संतोष राठोडनं मराठवाड्यातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा कसा केला? )
नेमके काय घडले?
डबल बायोमेट्रिक आयडी
खासगी कोचिंग क्लासेसनी विद्यार्थ्यांच्या नावाने दोन बायोमेट्रिक आयडी तयार केले. त्यामुळे एका विद्यार्थ्याच्या उपस्थितीची नोंद दोन वेगवेगळ्या आयडीवर दाखवली गेली, ज्यामुळे उपस्थितीची टक्केवारी कृत्रिमरीत्या वाढवली गेली.
शासकीय अनुदानाची फसवणूक
शासकीय नियमांनुसार, विद्यार्थ्यांना 75% उपस्थिती असणे गरजेचे असते, तेवढी उपस्थिती असल्यास कोचिंग क्लासेसना अनुदान दिले जाते. या फसवणुकीच्या माध्यमातून कोचिंग क्लासेसनी अनुदानाच्या नावाखाली सरकारकडून मोठी रक्कम घेतली.
विद्यार्थ्यांचा गैरफायदा
खरे तर विद्यार्थ्यांनी नियमित हजेरी लावली नव्हती. मात्र, बोगस बायोमेट्रिक नोंदीमुळे गैरहजेरीलाही उपस्थिती दाखवली गेली.
सारथी अधिकाऱ्यांचा सहभाग?
सामाजिक कार्यकर्त्यांच्या आरोपांनुसार, सारथीच्या काही अधिकाऱ्यांनीही यामध्ये हातभार लावला आहे. कोचिंग क्लासेस आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय आहे.
सारथी संस्थेची भूमिका
'या प्रकारात संस्थेचे नाव मुद्दामहून खराब केले जात आहे. आम्ही योग्य तपासणी करून दोषींवर कारवाई करू,' अशी प्रतिक्रिया सारथी संस्थेच्या एका अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर 'NDTV मराठी'ला बोलताना दिली आहे.