
दामदुप्पटने आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढल्या आहेत. त्यातून होणाऱ्या आर्थिक फसवणूकीचा आकडा देखील वाढत आहे. त्यातच ग्रामीण भागातील लोकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशातच मराठवाड्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून चर्चेत आलेल्या 30-30 घोटाळ्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी या घोटाळ्याचा म्होरक्या संतोष राठोडला बेड्या ठोकल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती 500 कोटींपेक्षा अधिक असल्याचं समोर आले. पुढे न्यायालयात साक्षीदार फितूर झाल्याने राठोड निर्दोष सुटला होता. पण आता याच 30-30 घोटाळ्यात पुन्हा शहर पोलिसातील उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अर्थिक गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे घोटाळा?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन आणि शेंद्रा परिसरात 2015 मध्ये डीएमआयसी सारखा प्रकल्प आला. या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांना 23 लाख रुपये एकरने मोबदला मिळाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी रातोरात कोट्यावधीश झाले. दरम्यान, याच काळात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एका छोट्याश्या गावात राहणाऱ्या संतोष राठोडने दामदुप्पट करून देणारी योजना आणली. यासाठी त्याने सुरवातीला बिडकीन परिसरातील आपल्या नातेवाईकांना जाळ्यात ओढलं.
माझ्याकडे पैसे गुंतवणूक केल्यास महिन्याला 7 टक्के परतावा देणार असल्याचे सांगत त्याने सुरवातीला लाखो रुपये जमा केले. विशेष म्हणजे त्याने परतावा देखील दिला. पाहता पाहता गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या वाढली. पुढे त्याने शक्कल लढवली आणि नवीन गुंतवणूकदार आणणाऱ्या सहकाऱ्यांना त्यांचं कमिशन देणं सुरू केलं.
( नक्की वाचा : Torres च्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कधीच परत मिळणार नाही? )
पोत्याने पैसे वाटले....
संतोष राठोडच आर्थिक साम्राज्य वाढत होतं. वाढत्या साम्राज्यात त्याने एक टोळी तयार केली. ज्यात महागड्या गाड्या, सूटबुटातील तरुण, अंगावर सोनं असणारी त्याची टोळी गावागावात फिरू लागली. या टोळीतील प्रत्येकाच्या गाडीचं तीस-तीस असं व्हीआयपी नंबर परिसरात चर्चेचा विषय बनू लागला. गुंतवणूकदारांना ही टोळी घरी जाऊन थेट पोत्यातून पैसे काढत परतावा देत होती.
हे चित्र पाहून अनेकांचे डोळे फिरायचे. यातूनच अनेकांचा मोह जागा झाला आणि गावागावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी या 30-30 योजनेत पैसे गुंतवायला लागला. पाहता पाहता शेकडो शेतकऱ्यांनी आपला मोबदला या योजनेत गुंतवला. काहींनी जमिनी विकून तर काहींनी घर विकून या योजनेत पैसे घातले. पुढे पोलीस, सरकारी अधिकारी, शिक्षक, हॉटेल चालक यांनी देखील या योजनेत पैसे गुंतवायला सुरुवात केली. एवढेच काय एका आमदाराचे देखील या योजनेत नाव समोर आलं.
( नक्की वाचा : Pune School : तुमची मुलगी सुरक्षित आहे? पुण्यातील प्रसिद्ध शाळेच्या चेंजिंग रुमध्ये आढळला कॅमेरा! )
अन् अचानक खेळ खल्लास!
खरं तर 2018 पासून संतोष राठोडने या योजनेची सुरुवात केली होती. एकाकडून आलेले पैसे दुसऱ्याला परतावा म्हणून देऊन तो साखळी वाढवत होता. पण 2021 मध्ये त्याचा गेम फसला. फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे अनेक जण संतोष राठोडकडे परतावाबाबत विचारणा करू लागले. पण आज उद्या करत तो नोव्हेंबर महिन्यांपर्यंत गुंतवणूकदारांना फिरवत राहिला. शेवटी नोव्हेंबर 2021 मध्ये संतोष राठोडवर पहिला गुन्हा दाखल झाला. पण दुसऱ्याच दिवशी तक्रारदार महिलेने माघार घेतल्याने संतोष राठोडला जामीन मिळाला. पण त्यानंतर देखील लोकांचा परतावा मिळत नव्हता. त्यामुळे 21 जानेवारी 2022 संतोष राठोडवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आणि तिथेच संतोष राठोडचा खेळ खल्लास झाला.
पोलीस चौकशी संतोष राठोडचे कारनामे समोर येऊ लागले. पोलिसांना तपासात संतोष राठोडकडे दोन डायऱ्या मिळाल्या. ज्यात गुंतवणूकदारांची माहिती होती. पोलिसांनी केलेल्या तपासात संतोष राठोडने गेल्या काही वर्षात या योजनेच्या नावाखाली तब्बल 500 कोटींपेक्षा अधिकची उलाढाल केली होती.
( नक्की वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर, महाजन कुटुंबीयातील व्यक्तीकडूनच जमीन हडपण्याचा आरोप )
शेतकरी रातोरात रस्त्यावर.....
बिडकीन परिसरात आलेल्या डीएमआयसीमुळे शेतकऱ्यांना मोठा मोबदला मिळाला होता. त्यामुळे या परिसरातील चेहरा मोहरा बदलला. मातीच्या घरात राहणाऱ्या अनेकांनी बंगले बांधले. घराघरात चारचाकी दिसायला लागली. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीतच बदलली होती. मिळालेल्या मोबदल्याची कुठे गुंतवणूक करावी यासाठी शेतकरी पर्याय शोधत असतानाच या परिसरात 30-30 योजना आली. अनेक शेतकऱ्यांनी जवळ असलेला सर्व पैसा या योजनेत गुंतवला. पण पुढे हा घोटाळा समोर आला आणि शेतकऱ्यांचे पैसे बुडाले. कालपर्यंत कोट्यावधीश असलेले शेतकरी रातोरात रस्त्यावर आले.
राठोड कसा सुटला?
छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेने या सगळ्या घोटाळ्याचा तपास करत अनेक पुरावे जमा केले. संतोष राठोड आणि त्याच्या टोळीतील लोकांची कुंडली जमा केली. पाहता पाहता फसवणूक झालेले अनेक गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी समोर येऊ लागले होते. पण जेव्हा न्यायालयात प्रकरण पोहोचलं तेव्हा अनेक साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे पोलिसांच्या हातून प्रकरण निसटलं आणि संतोष राठोडला न्यायालयाने निर्दोष ठरवलं.
आता पुन्हा अडकला....
न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर आपण आता मोकळे झालो असं संतोष राठोडला वाटत होतं. पण दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 27 नोव्हेंबर 2014 रोजी संतोष राठोडवर पुन्हा एकदा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष राठोडसह त्याच्या सहकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल झाला. या आरोपींच्या विरोधात आतापर्यंत 54 तक्रारी दाखल झाले आहे. त्यामुळे या नव्याने दाखल झालेल्या तक्रारीचा आकडा 15 कोटींपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे आता शहर पोलिसांकडून तरी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देता येतो का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
काय म्हणाले पोलीस?
ज्यांची या सर्व प्रकरणात फसवणूक झाली आहे, त्यांनी आपली कागदपत्र घेऊन पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांची कायदेशीर तक्रार घेतली जाईल. जशी जशी तक्रादारांची संख्या वाढेल यातील रक्कम देखील वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणात सुरुवातीला दोन आणि आता आणखी एकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world