राहुल तपासे
सातारा शहरातील बसप्पा पेठ परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाला पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी युक्तीने पकडले आहे. त्याला पकडल्यानंतर तिथल्या लोकांनी त्याला बेदम चोप दिला. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक शाळकरी मुलगी या भागातून जात असताना एक युवक तिला रस्त्यात अडवून एका बाजूला घेऊन गेला. बोलता बोलता त्याने खिशातून धारदार चाकू काढला. मुलीच्या गळ्याला लावून "तुला ठार मारीन," अशी धमकी दिली. त्यावेळी तिथं बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. आरडाओरडा सुरू झाला. पण त्याच्या हातात चाकू होता. त्यामुळे लोकांनी जर सबुरीने घेतलं.
स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना सूचना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र युवकाने चाकू बाजूला न ठेवता उलट धमकी द्यायला सुरुवात केली. "कोणी जवळ आलात तर हिला ठार करीन," असे तो ओरडत होता. काही महिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, युवकाच्या पाठीमागे असलेल्या भिंतीवरून एका धाडसी स्थानिक युवकाने खाली उडी मारून दबक्या पावलांनी त्याच्याजवळ जाऊन चाकू पकडला. त्याच वेळी इतरांनीही झडप घालून आरोपीला जमिनीवर पाडले आणि जमावाने त्याच्यावर तुटून पडत बेदम मारहाण केली.
Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड
मारहाण करत असताना प्रथम मुलीला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या झटापटीत त्या मुलीच्या गळ्याला चाकूचा थोडासा स्पर्श झाल्याने ती किरकोळ जखमी झाली. तसेच आरोपीला पकडणाऱ्या युवकालाही हातावर किरकोळ इजा झाली. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, युवकाचे त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते, आणि त्यामुळेच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी मुलीच्या जबाबानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मात्र आरोपीचे वय लक्षात घेऊन पुढील कायदेशीर निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेचा काही भाग काही नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे. संबंधित शाळेचे संस्थापक तसेच शिक्षक शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. या घटनेनंतर शहरात भितीचे वातावरण आहे. शिवाय मुली सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्नही विचारला जात आहे. दरम्यान पोलिसांनी त्या मुलाला अटक केली आहे. शिवाय त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.