कराडमध्ये 24 तासांत 2 हत्या, आरोपींनी मारहाणीचा व्हिडीओ शूट करत सोशल मीडियावर केले शेअर

Crime News: कराडजवळ 24 तासांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे दोन्ही हत्याकांड वैयक्तिक कारणावरून घडल्याचे म्हटले जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Karad Crime: दोन हत्यांमुळे कराड शहर हादरले

- सुजित आंबेकर/ कराड

कराडजवळ 24 तासांमध्ये हत्येच्या दोन घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हे दोन्ही हत्याकांड वैयक्तिक कारणावरून घडल्याचे म्हटले जात आहे. कराडमधील मुंढे येथे शनिवारी (20 एप्रिल) सहा जणांनी केलेल्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. तर विमानतळ रस्त्याजवळ झालेल्या किरकोळ वादातून 15 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढे येथे दांडक्यांसह प्लास्टिक पाइपने बेदम मारहाण करून करण संपत बर्गेची (वय 28 वर्ष) निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दोन जण फरार

अजित सावंत (वय 36 वर्ष), निवास सावंत (वय 45 वर्ष), सुधीर सावंत (वय 41 वर्ष) व स्मिता सावंत (वय 28 वर्ष) या चौघांना अटक करण्यात आली आहे. तर विनोद माने व विनायक पवार हे दोन जण फरार आहेत. करण बर्गे हा शनिवारी कराडमध्ये आला होता. यावेळेस दुपारच्या सुमारास त्याला सहाजणांनी मारहाण झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. 

Photo Credit: Reporter Sujeet Ambekar

आरोपींनी मारहाणीचे व्हिडीओ स्टेटसमध्ये केले शेअर  

धक्कादायक बाब म्हणजे मारहाणीचे फोटो-व्हिडीओ करणच्याच मोबाइलमध्ये सोशल मीडियावर स्टेटसमध्येही ठेवले. सोशल मीडियावरील स्टेटस पाहिल्यानंतरच करणला मारहाण केल्याची माहिती समोर आली. 

यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळेस मारहाण करणारे लोक तेथेच होते. त्यांनी नातेवाईकांनाही शिवीगाळ करत दमदाटी केली. दरम्यान गंभीर जखमी व बेशुद्धावस्थेत असलेल्या करणला नातेवाईकांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळेस उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तातडीने मुंढे येथे दाखल झाले. पंचनामा करून रविवारी (21 एप्रिल) पहाटे वारुंजी परिसरातून चार आरोपींना अटक केले.  

Advertisement

Photo Credit: Reporter Sujeet Ambekar

(नक्की वाचा:  पत्नीचा छळ, पोलिसांची धमकी; तरुणाची गळफास घेत आत्महत्या)

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून हत्या?

दरम्यान मारहाणीसाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक पाइप पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक अझरुद्दीन शेख या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, प्रेमसंबंधाच्या संशयावरून करण बर्गेला मारहाण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याच संशयावरून आरोपींनी करणला मुंढे येथे बोलावून मारहाण केल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.   

(नक्की वाचा : 'फैयाजला कडक शिक्षा द्या', नेहाची हत्या करणाऱ्या आरोपीच्या वडिलांनी हात जोडून मागितली माफी)

अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक 

दुसरीकडे मुंढे येथील विमानतळ रस्त्याजवळ किरकोळ वादावरून अल्पवयीन मुलाच्या डोक्यामध्ये दगड घालून हत्या करण्यात आली. या घटनेत मृत पावलेल्या मुलाचा भाव देखील गंभीर स्वरुपात जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवार (21 एप्रिल) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सचिन भिसे (वय 20 वर्ष) आणि बाळू चव्हाण (वय 31 वर्ष) या दोघांना गुन्हे शाखेने अटक केले आहे.

Advertisement

Photo Credit: Reporter Sujeet Ambekar

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पावलेला अल्पवयीन मुलगा मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. कराड येथील एका भंगारच्या दुकानात तो काम करत होता आणि वारूंजी गावामध्ये भाडेतत्त्वावर घेण्यात आलेल्या घरामध्ये भावासोबत राहत होता. रविवारी दुपारच्या सुमारास दोघंही फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले. यावेळेस कराड-पाटण महामार्गाच्या फुटपाथवरून चालत ते विमानतळ येथे मुंढे गावच्या एका किराणा दुकानासमोर पोहोचले. यावेळेस आरोपी व या मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.

(नक्की वाचा : क्षुल्लक कारणावरुन रिक्षा चालकाचा बाईकस्वारावर रॉडने हल्ला, डोंबिवलीत रिक्षा चालकाची मुजोरी)

दगडाने ठेचून केली हत्या

हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी दगडाने अल्पवयीन मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये डोक्याला गंभीर इजा झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला. 

Advertisement

घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळावर दाखल झाले आणि पंचनामा करून त्यांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. दरम्यान या दोन्ही घटनांमुळे कराड शहर हादरले आहे.

VIDEO: भाजप खासदार Ramdas Tadas अडचणीत? निवडणुकीआधी सुनेचे गंभीर आरोप

Topics mentioned in this article