राहुल तपासे आणि सागर जोशी, प्रतिनिधी
Satara Doctor Suicide Case : फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या (Female Doctor Suicide) प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज (सोमवार, 3 नोव्हेंबर) फलटण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत थेट पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले.
मुख्य आरोप आणि ठिय्या
फलटण येथील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी सुषमा अंधारे आक्रमक झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक (SP) तुषार दोषी भेटले नाहीत, म्हणून अंधारे यांनी संताप व्यक्त करत पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं.
मृत डॉक्टर महिलेला न्याय देण्याऐवजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मिळून महिलेचे चारित्र्यहनन केल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला.
( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
याशिवाय, अंधारे यांनी भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावरही घणाघात केला. "जयकुमार गोरे त्या महिला डॉक्टरचं चारित्र्य ठरवणार का? त्यांनी आधी स्वतःच्या चारित्र्याकडे पाहावे," असे त्या म्हणाल्या.
आरोपींच्या चौकशीची मागणी
सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात ज्या 6 जणांची नावे आली आहेत, त्यांची कसून चौकशी करण्याची मागणी केली. त्यांनी थेटपणे प्रश्न विचारला की, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) राहुल धस, पोलीस निरीक्षक (API) जायपात्रे, माजी खासदाराचे 2 PA (शिंदे आणि नागटिळक), पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ यांच्यावर आरोपपत्र (Chargesheet) का दाखल केले गेले नाही?
पोलिसांनी दिले आश्वासन
- सुषमा अंधारे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आणि ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी काही महत्त्वपूर्ण आश्वासने दिली.
- महिला डॉक्टरबद्दल सोशल मीडियावर असलेले सर्व आक्षेपार्ह मजकूर (Objectionable Content) काढून टाकण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.
- महिला डॉक्टरच्या नातेवाईकांचा नव्याने जबाब घेतला जाणार आहे.
- हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) चालवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
- पोलिसांकडून ही आश्वासने मिळाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
खुल्या चर्चेचे आव्हान
दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आरोपांवर खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आव्हान दिले आहे की, सुषमा अंधारे, मेहबूब शेख, अंबादास दानवे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या खुर्च्या सन्मानपूर्वक राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : फोटोवरून वाद, शेवटचा कॉल... डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वीची धक्कादायक माहिती उघड )
या सर्व घडामोडींमुळे, हे प्रकरण अजून कोणते वळण घेणार, पोलीस या प्रकरणात काय आणि कशी चौकशी करणार आणि सुरू झालेले हे राजकारण कुठपर्यंत जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world