हनीट्रॅपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उकळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना साताऱ्यामध्ये घडली असून त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत. साताऱ्यातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरला या हनिट्रॅपच्या जाळ्यात ओढण्यात आलं. शिवाय त्याच्याकडून तब्बल 1 कोटीची खंडणी मागण्यात आली. या संपूर्ण घटनेनं संबधीत डॉक्टर आणि त्यांचे कुटुंब हादरून गेले होते. मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत सावध पावलं उचलली. त्यामुळे ज्यांनी हा हनीट्रॅप रचला होता त्यांचा परदाफाश होण्यास मदत झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सातारा जिल्ह्यातील खंडाळा इथं एक डॉक्टर आपला व्यवसाय करतात. त्यांचे तीन ठिकाणी दवाखाने आहेत. हे डॉक्टर प्रतिष्टीत समजले जातात. त्यांच्या दवाखान्यात एक तरुणी कामाला होती. मात्र काही दिवसांपूर्वी ती अचनक बेपत्ता झाली. याबाबतची तक्रारी शिरवळ पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. त्याच वेळी त्या तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओत ती संबधीत डॉक्टर बरोबर दिसत होती. याचाच गैरफायदा घेत डॉक्टरांसाठी हनीट्रॅप रचण्यात आला.
हा व्हिडीओ संबधीत डॉक्टरच्या मोबाईलवर पाठवण्यात आला. शिवाय ही व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे बदनामी टाळायची असल्यास 1 कोटी रुपये द्यावे अशी मागणी करण्यात आली. 6 मार्च पासून हे खंडणीखोर डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे लागले होते. त्यांनी पैशांसाठी तगादा लावला होता. हे प्रकरण हनीट्रॅपचे दिसत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यांनी याची कल्पना पोलीसांना देण्याचा निर्णय घेतला.
पोलीसांना त्यांनी याबाबतची सर्व माहिती दिली. पोलीसांनी सांगितलेल्या सुचनेनुसार खंडणीखोरांना एक कोटी खंडणी देण्याचे डॉक्टरांनी मान्य केले. तसे त्यांनी खंडणीखोरांना सांगितले. त्यानुसार रामेश्वर मंदीर परिसरात खंडणी देण्याचे निश्चत झाले. मात्र त्याच वेळी पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला. डॉक्टर आणि त्यांची पत्नी खंडणीचे पैसे घेवून रामेश्वर मंदीरा जवळ पोहोचले. तिथं ते खंडणीखोराची वाट पाहात बसले होते. शिवाय पोलीसही साध्या वेशात तिथे उपस्थित होते.
त्याच वेळी तिथे एका मोटरसायकल वरून दोन तरुण आले. त्यांना डॉक्टर दाम्पत्याने खंडणीची रक्कम दिली. त्याच वेळी पोलिसांनी या खंडणीखोरांवर झडप टाकली. त्यांच्याकडून दिड लाख रुपये हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी नितिन प्रधान या 20 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. तो बीडचा रहिवाशी आहे. तर त्याचा दुसरा साथिदार दत्ता आप्पाराव घुगे याला ही अटक करण्यात आली आहे. त्याचे वय 24 वर्ष असून तो लातूरचा आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड मात्र फरार असल्याचं सांगितलं जात आहे.