
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा झाल्यानंतर अखेर आज भाजपची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाचा समावेश आहे. यातील संदीप जोशी या नावाकडे विशेष लक्ष दिलं जात आहे. जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे महाविद्यालयापासूनचे मित्र आहेत. ते त्यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. ते आता विधान परिषदेवर दिसणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत संदीप जोशी?
संदीप जोशी नागपूर महानगरपालिकेत सलग चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. 2020 ते 2021 या कालावधीत ते नागपूर शहराचे महापौर होते. 2017 ते 2019 दरम्यान राज्यमंत्री दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाने त्यांना 2020 मध्ये पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. 2023 ते 2024 या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात मानद सचिव म्हणून काम पाहिले. संदीप जोशी यांचे वडील, दिवाकर जोशी, 1986 ते 1992 या काळात विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते. संदीप जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत. कोविड काळात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे आणि तत्कालीन महापौर संदीप जोशी यांच्यात वारंवार जाहीर वाद झाले होते. याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर विधान परिषद पदवीधर मतदारसंघात 2020 मध्ये त्यांना उमेदवारी जाहीर झाली. तुकाराम मुंडे यांच्या समर्थकांनी त्यावेळी संदीप जोशी यांच्या विरोधात प्रचार केला होता. आणि भाजपची हमखास जिंकणारी मानली जाणारी ही जागा त्यांना गमवावी लागली आणि त्यांचा पराभव झाला.
नक्की वाचा - Sharad Pawar : शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं; पत्र लिहून केली 'ही' मागणी
संजय केनेकर कोण आहेत?
संजय केनेकर यांच्या पक्षाची संघटनात्मक जबाबदारी आहे. भाजपने केनेकरांच्या निमित्ताने मराठवाड्यात पुन्हा एक आमदारकी दिली आहे. संजय केनेकर हे ओबीसी समाजाचे असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांचं मोठं संघटनात्मक काम आहे. 1990 च्या आधीपासून ते पक्षात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी नगरसेवक, उपमहापौर ही पदं सांभाळली आहे. भाजपच्या युवा मोर्चापासून ते सक्रीय आहे. सध्या ते भाजपच्या प्रदेश सरचिटणीस दावर कार्यरत आहेत.
दादाराव केचे कोण आहेत?
दादाराव यादवराव केचे भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) उपाध्यक्ष आहेत. त्यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघातून 14 व्या महाराष्ट्र विधानसभेत सदस्य म्हणून काम केले आहे. दादाराव केचे 2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आर्वी मतदारसंघातून निवडून आले, जिथे त्यांनी तत्कालीन आमदार अमर शारद्राव काले यांना 12,467 मतांच्या फरकाने हरवले. ते सध्या भाजप, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या राजकीय निर्णयांमध्ये सहभाग घेतला आहे. सध्या ते पक्षातील अंतर्गत संघर्षामुळे राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणा केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world