
लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात जोरदार धक्का बसला. काँग्रेसने मुसंडी मारत सर्वाधिक खासदार निवडून आणले. ही सल भाजप नेत्यांच्या मनात आजही असल्याचे दिसून येते. केंद्रातलं मोदी सरकार सध्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूवर आहे. याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळेच एक एक खासदाराची बेगमी करण्याची संधी भाजप नेते साधत आहेत. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत स्थानिक खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खासदार विशाल पाटील हे अपक्ष म्हणून सांगली लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठींबा दिला आहे. सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला गेल्याने पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली. शिवाय विजय ही मिळवला होता. विशाल पाटील यांनी जरी काँग्रेसला पाठींबा दिली असला तरी ते अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुठे जायचे कुणाला पाठींबा द्यायचा याचे बंधन नाही. त्यामुळे विशाल पाटील हे आपल्या गळाला लागू शकतात असं भाजपला वाटतं. तसं झाल्यास भाजपची संख्या एकने वाढणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री आणि भाजपचे जेष्ट नेते चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांना थेट ऑफर दिली आहे. ही ऑफर त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत दिली. राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं. वर्तमानमध्ये विशाल पाटील यांच्याकडे चार वर्षे चार महिने आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी याचा विचार करावा. ते आमच्या बरोबर आल्यास त्यांना अपेक्षीत असलेला सांगलीचा विकास नक्की होईल. त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असे आवाहन ही चंद्रकांत पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.
ही पत्रकार परिषद सुरु असताना खासदार विशाल पाटील हे त्यांच्या बाजूलाच बसले होते. ते शांत पणे सर्व काही ऐकत होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या ऑफर बाबद छेडले. त्यावर पाटील यांनी मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे असं सांगत विषय तिथेच संपवला. शिवाय आता आपण निघुयात असं ही त्यांनी मंत्री पाटील यांना सुचित केलं. विशाल पाटील हे कट्टर काँग्रेसचे मानले जातात. त्यांचे संपुर्ण घराणे काँग्रेससाठी काम करत आले आहेत. अशा वेळी पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर विशाल पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सांगली लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेला होता. मात्र या मतदार संघावरील दावा काँग्रेसने शेवटपर्यंत सोडला नाही. विशाल पाटील यांनी शेवटच्या क्षणी बंडखोरी केली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची ही विशाल पाटील यांना साथ मिळाली. आमदार विश्वजीत कदम यांनीही पाटील यांचेच काम केल्याचे नंतर स्पष्ट झाले. या निवडणुकीत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यानंतर दिल्लीत जात काँग्रेस पक्षाला आपला पाठिंबा जाहीर केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world