सुजित आंबेकर, प्रतिनिधी
Crime News : आई आणि मुलाचं नातं जगाच्या पलीकडचं असतं. हे नातं कायम अतूट असतं. मात्र साताऱ्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधातून आईनेच प्रियकराच्या मदतीने तरुण मुलाच्या खुनाचा कट रचला. प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने दगडाने ठेचून मुलाचा खून करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित तरुणाचा जीव वाचला असून याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातून कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शोभा महादेव शेंडगे (वय 38), जयेंद्र गोरख जावळे (40) सिद्धार्थ विलास वाव्हळे (25), अकबर मेहबूब शेख (25) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत, तर खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या प्रशांत महादेव शेंडगे (24) याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नक्की वाचा - Pune news: प्रेमसंबंधातून आधी धारधार शस्त्राने हल्ला, मग पोलीसांनी काढली भर बाजारातून धिंड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वराडे हद्दीत सागवानाच्या शेतामध्ये बुधवारी रात्री प्रशांत शेंडगे हा तरुण जखमी स्थितीत आढळून आला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलं. तसेच, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, अरुण देवकर, सहायक निरीक्षक किरण भोसले, विश्वास शिंगाडे यांच्यासह कर्मचाऱ्यांची चार पथके तयार करून या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात करण्यात आली.
पोलिसांनी माहिती घेतली असता, प्रशांत शेंडगे याच्या आईचे अनैतिक संबंध असल्यामुळे प्रशांत वारंवार वाद घालत होता. तो व्यसनाधीन असल्यामुळे आई शोभा हिने तिचा प्रियकर जयेंद्र जावळे याच्या मदतीने प्रशांतचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासातून निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी चौघांना अटक केले आहे. याबाबतची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे.