राहुल कुलकर्णी, पुणे: पुण्यातील भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आली. या भयंकर हत्याप्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. अनैतिक संबंधातून सतिश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिने पतीचा काटा काढल्याचे समोर आले होते. अशातच या प्रकरणात आता मोहिने वाघने मृत पती सतिश वाघ यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे.
पुण्यातील व्यावयासिक सतिश वाघ यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी मोहिनी वाघसह प्रियकर अक्षय जावळकर आणि त्याच्या मित्रांना अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधाच्या वादातून पत्नी मोहिनी वाघनेच पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. मात्र याबाबत अटकेत असलेल्या मोहिनी वाघने आता सतिश वाघ यांच्याबाबत गंभीर खुलासा केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पती सतीश वाघ याचेही बाहेर अनैतिक संबंध होते. माझाही तो गेल्या वर्षांपासून दहा शारीरिक, मानसिक छळ करीत होता. हा सर्व त्रास असहाय्य झाला होता, असा खुलासा सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी हिने केल्याचे तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी सांगितले आहे. मोहिनी वाघ यांच्या या दाव्याने या प्रकरणात नवा ट्वीस्ट निर्माण झाला आहे.
दरम्यान, पुण्याच्या मांजरी बुद्रुक येथील शेतकरी व हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला बुधवारी अटक करून गुरुवारी न्यायालयात हजर केले होते.खूनाचा अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाने सर्व आरोपीना पोलिस कोठडी सुनावली आहे.
तसेच सतीश यांचा खून करण्यासाठी अक्षयला पाच लाख रुपये कसे दिले, याच्या तपासासाठी अक्षयची सर्व बँक खाती तपासण्यात आली आहेत. आरोपींकडून मिळत असलेल्या माहितीच्या आधारावर अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती तपास अधिकारी गायकवाड यांनी दिली आहे.