बाबा चिडले म्हणून दोन्ही मुलांनी घर सोडलं; चिंताग्रस्त पालकांची पोलीस ठाण्यात धाव

वडिलांनी ओरडल्याच्या रागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील 2 शाळकरी मुलांनी घर सोडल्याचा प्रकार घडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सिंधुदुर्ग:

प्रतिनिधी, गुरुप्रसाद दळवी

वडिलांनी ओरडल्याच्या रागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील 2 शाळकरी मुलांनी घर सोडल्याचा प्रकार घडला आहे. हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. दोघांनीही घर सोडल्यानंतर त्यांचे वडील बाबुराव चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलं बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सिगानिया कुमार आणि हसमुख कुमार अशी त्या दोघांची नावे आहेत. याबाबत त्यांचे वडील बाबुराव चव्हाण यांनी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

मुलांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे बांदा बाजारपेठेत दुकान आहे. त्या दिवशी त्यांची दोन्ही मुलं दुकानाजवळ मस्ती करीत होते. यावेळी बाबुराव चव्हाण गोव्याहून प्रवास करून आले होते. प्रवासामुळे थकलेल्या वडिलांनी त्यांना घरी जा म्हणत ओरडा दिला. त्यानंतर दोघेही मुलं रागावून तिथून निघून गेले. मुलं घरी रुसून बसली असतील म्हणून लगेचच बाबुराव चव्हाण यांची पत्नी घरी पोहोचली. मात्र दोघेही घरी नव्हते. म्हणून त्यांनी मुलांची शोधाशोध सुरू केली. परंतू दोघांचा काहीही पत्ता लागला नाही. त्यामुळे चिंताग्रस्त पालकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. बाबुराव चव्हाण यांनी मुलं बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत. 

(तरी या संदर्भात कोणाला अधिक माहिती मिळाल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा पोलीस स्टेशनशी संपर्क करा. - संपर्क क्रमांक : 02363270233)