Shirdi News : रस्त्यावर रक्ताचा सडा अन् साईभक्तांचा आक्रोश; मदतीऐवजी लालपरीने दाखवली पाठ, नागरिकांचा संताप

शिर्डीजवळ झालेल्या लालपरी आणि एर्टिगा कारच्या भीषण अपघातात दोन मयत तर दहा जण जखमी झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुनिल दवंगे, प्रतिनिधी

Shirdi News : शिर्डीजवळ झालेल्या लालपरी आणि एर्टिगा कारच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दहा जण जखमी झाले आहेत. या दरम्यान एक विदारक आणि संतापजनक बाब समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर प्रवासी साईभक्त आक्रोश करीत होते. एका बाजूला धडक बसलेली लालपरी आणि दुसऱ्या बाजूला चक्काचूर झालेली एर्टिगा कार. आजूबाजूला रक्ताचा सडा पडला होता आणि जखमींच्या मदतीसाठी आर्त हाका दिल्या जात होत्या. अशा परिस्थितीत घटनास्थळी उपस्थित पोलीस आणि स्थानिक नागरिक जखमींना तातडीची मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत होते.

लालपरीने फिरवली पाठ...

याच दरम्यान शिर्डीकडे जाणारी सासवड-पुणे या डेपोतील MH14 MH 7381 ही दुसरी एसटी बस घटनास्थळावर आली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी आणि नागरिकांनी बस थांबवण्याचा प्रयत्न केला. चालकाने सुरुवातीला ब्रेकही लावला. मात्र काही क्षणातच बस न थांबवता चालकाने वेग वाढवत तिथून पळ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Shirdi News : साईबाबांच्या चरणी दान, आरतीवेळी बाबांजवळ दिसणार अनोखी वस्तू; दानशूर भाविकाची ओळख मात्र गुप्त

अपघाताच्या वेळी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी वाहनांची गरज असते. अशा वेळी मदतीचा हात पुढे करण्याऐवजी दुर्लक्ष केल्याने उपस्थितांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित चालक आणि वाहकाने मात्र आपली बाजू मांडताना ही बस प्रासंगिक करार तत्वावरील असल्याने प्रवासी तिकीट देता येत नाही, तसेच रस्त्यावर अपघात झाल्याचं दिसलंच नसल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.