धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी शहरात पोलिसांनी मोठ्या गुटखा रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गणेशवाडी परिसरातील ‘आनंद निवास' या इमारतीत छापा टाकून पोलिसांनी चार लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी आशिष खाबिया या गुटखा तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे. तर यात खाबिया हा फक्त प्यादा असून यातील मुख्य सूत्रधार मोकाट असल्याची चर्चा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिर्डी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने गणेशवाडीतील आनंद निवास इमारतीत छापा टाकला. या छाप्यात विविध नामांकित कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. पोलिसांनी गुटखा साठ्यासह खाबिया नावाच्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली आहे.
नक्की वाचा - Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमध्ये भररस्त्यात साधुची हत्या, धक्कादायक CCTV समोर
या गुटखा साठ्यामागे एक हाय प्रोफाईल ‘गुटखा किंग'चा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ह्या प्रकरणी राजकीय वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त होत असून, गुटखा तस्करीचं हे रॅकेट गेल्या अनेक वर्षापासून सक्रिय असल्याचं समोर येत आहे. पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाने याठिकाणी एकत्रित कारवाई करत चार लाखांचा गुटखा जप्त केला आहे.