iPhone Factory Murder Case: एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 19 वर्षांच्या तरुणीने स्वतःच्या नवजात बाळाची जन्म होताच निर्घृण हत्या केली. सामाजिक भीती आणि बदनामीच्या दहशतीपोटी एका मातेने आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा चिरून त्याला कचऱ्याच्या डब्यात फेकून दिले. ही हृदयद्रावक घटना एका प्रसिद्ध आयफोन बनवणाऱ्या कारखान्यात घडली आहे. हा कारखाना कर्नाटक राज्यातील बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यात असून तिथे काम करणाऱ्या एका 19 वर्षांच्या तरुणीने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे.
कारखान्याच्या शौचालयात बाळाला जन्म
मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका नावाची 19 वर्षांची तरुणी या कारखान्यात कामगार म्हणून कार्यरत आहे. कामावर असतानाच तिला अचानक प्रसव कळा सुरू झाल्या, ज्यामुळे ती तातडीने कारखान्यातील शौचालयात गेली. तिथेच तिने बाळाला जन्म दिला.
मात्र, बाळ जन्माला आल्यानंतर तिने कोणाचीही मदत घेतली नाही. त्याऐवजी अत्यंत क्रूरपणे बाळाचा गळा चिरला आणि मृतदेह शौचालयातील डस्टबिनमध्ये असलेल्या काळ्या रंगाच्या पिशवीत लपवून ठेवला.
(नक्की वाचा : Dombivli News : ना भेट,ना बोलणं , थेट लॉजवर बोलावणं, डोंबिवलीच्या जावेदचा नातेवाईकांनी केला 'करेक्ट कार्यक्रम' )
कसा झाला प्रकार उघड?
हा गंभीर प्रकार तेव्हा उघड झाला जेव्हा कारखान्यातील दुसरी एक कर्मचारी शौचालयात गेली. डस्टबिनमध्ये रक्ताने माखलेली पिशवी आणि त्यात बाळाचा मृतदेह पाहून त्या कर्मचाऱ्याला मोठा धक्का बसला. तिने तातडीने आरडाओरडा करून प्रशासनाला याची माहिती दिली. या घटनेमुळे कारखान्यातील इतर कामगारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.
(नक्की वाचा : Akola News: महाराजांनी लहान मुलाला दाताने पकडले? अकोल्याचा Video शेअर करण्यापूर्वी वाचा पोलिसांचा खुलासा )
बदनामीच्या धास्तीने उचलले पाऊल
विश्वनाथपुरा पोलीस ठाण्याचे पथक माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली. रेणुका ही अविवाहित असून तिला समाजात होणाऱ्या बदनामीची भीती वाटत होती. अविवाहित असताना बाळ होणे ही बाब सामाजिक कलंक ठरेल, या दहशतीतून तिने बाळ झाल्याचे कोणालाही कळू दिले नाही आणि जन्म होताच त्याची हत्या केली.
बाळंतपणानंतर आणि या क्रूर घटनेनंतर आरोपी रेणुकाची प्रकृती बिघडली आहे. तिला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. बेंगळुरू येथील या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.