Pune News : शिवरायांच्या सिंहगडावर संतापजनक कृत्य; गाडीच्या तपासणीदरम्यान आढळलं...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक असलेल्या सिंहगडावर संतापजनक कृत्य घडत असल्याचं समोर येत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक असलेल्या सिंहगडावर संतापजनक कृत्य घडत असल्याचं समोर येत आहे. सिंहगडावर जाणाऱ्या वाहनातून मागील २१ दिवसांत दुसऱ्यांदा दारूच्या बाटल्या आढळण्याची घटना समोर आली आहे. उपद्रवशुल्क घेत असताना संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांनी गाडीची तपासणी केली असता वाहनातून दारूची बाटली जप्त करण्यात आली. रविवारी संध्याकाळी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान मुंबई आरटीओच्या अंतर्गत नोंद असलेली एक कार सिंहगडाच्या दिशेने निघाली होती. गोळीवाडी येथील वनविभागाच्या उपद्रवशुल्क नाक्यावर हे वाहन तपासणीसाठी थांबविण्यात आले. 

उपद्रवशुल्क घेत असताना संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांनी वाहनचालकांना गाडीत मद्य आहे का, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी ‘नाही' असं उत्तर दिलं. तसेच धूम्रपानाचे साहित्य आहे का, असे विचारल्यावर त्यांनी सिगरेट दाखवली. ती जप्त केली.

नक्की वाचा - Pune News : पुण्यात 'मानव विरुद्ध बिबट्या' संघर्ष वाढला, ग्रामीण भागासह आता शहराला वेढा

दरम्यान, वाहनातील चारही व्यक्तींचे हावभाव संशयास्पद वाटल्याने सुरक्षारक्षक यांनी त्यांना वाहनातून खाली उतरून तपासणीस सहकार्य करण्यास सांगितले. वाहनाची पाहणी केली असता सीटखाली मोठी मद्याची बाटली आढळून आली. संबंधित वाहनचालकांवर दंड ठोठावण्यात आला आहे. सिंहगड परिसर वनविभागाच्या अखत्यारित असून, तो पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या अंतर्गत संरक्षित क्षेत्रात येतो. त्यामुळे येथे मद्यपान, धूम्रपान आणि मांसाहारास सक्त मनाई आहे. 

Advertisement

कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड किल्ला पुण्यातील एक सुप्रसिद्ध किल्ला आहे. शूर सरदार तानाजी मालुसरे यांचं कोंढाण्याच्या किल्ल्यावर मुघलांशी युद्ध झालं होतं. त्याच्या शौर्याची आठवण म्हणून पुढे शिवाजी महाराजांची या किल्ल्याचं नाव बदलून सिंहगड ठेवलं. इतिहासाची आणि शौर्याची आठवण करून देणाऱ्या गडावर काही मंडळी दारू पितात ही बाब संतापजनक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

Topics mentioned in this article