जाहिरात

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री भयानक हत्याकांड! पत्नीचा गळा आवळला, निष्पाप मुलांसोबतच मृतदेह घेऊन केला प्रवास

Samriddhi Highway Murder: समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना एका व्यक्तीनं अत्यंत क्रूरपणे स्वतःच्या पत्नीची कारमध्येच हत्या केल्याची थरारक घटना समोर आली आहे.

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री भयानक हत्याकांड! पत्नीचा गळा आवळला, निष्पाप मुलांसोबतच मृतदेह घेऊन केला प्रवास
Samriddhi Highway Murder: आरोपी पती वारंवार आपले जबाब बदलत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. (प्रतिकात्मक फोटो)
वाशिम:

साजन धाबे, प्रतिनिधी

Samriddhi Highway Murder: समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना एका व्यक्तीनं अत्यंत क्रूरपणे स्वतःच्या पत्नीची कारमध्येच हत्या केल्याची थरारक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर आरोपी  पत्नीचा मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास परिसरात फिरत होता. शेवटी पहाटेच्या सुमारास आरोपीने स्वतः वाशिमच्या कारंजा शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली. प्राथमिक तपासात चारित्र्याच्या संशयातून हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील कलवर्धा येथील रहिवासी असलेला सलमान खान नेक मोहम्मद खान (वय 30) हा त्याची पत्नी हसीनबानो (वय 28) आणि तीन लहान मुलांसह  कारने प्रवासाला निघाला होता. हे कुटुंब समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. मध्यरात्रीच्या सुमारास कारंजा परिसराजवळ गाडी पोहोचली असता, आरोपी सलमानने गाडी महामार्गाच्या कडेला एका शांत आणि निर्मनुष्य ठिकाणी थांबवली. यावेळी त्याची तीन लहान मुले मागे गाढ झोपेत होती. तिथे पती-पत्नीमध्ये जोरदार वाद सुरू झाला. 

या वादात रागाच्या भरात सलमानने गाडीत असलेला लोखंडी रॉड काढून हसीनबानोच्या डोक्यावर जोरदार वार केले. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली, तरी तिचा जीव गेला नसल्याचे पाहून त्याने तिचा गळा आवळून खून केला.

( नक्की वाचा : Shraddha Walkar: 'आफताब कोर्टात हसतो,आम्ही मात्र रोज मरतोय,' श्रद्धाच्या आत्याचा डोळ्यात पाणी आणणारा आक्रोश )

मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास प्रवास 

हत्या केल्यानंतर आरोपीने हसीनबानोचा मृतदेह कारमध्येच ठेवला आणि मागे झोपलेली निष्पाप मुले तशाच स्थितीत असताना त्याने कारंजा शहर आणि महामार्गावर अनेक तास गाडी चालवली. अखेर पहाटेच्या सुमारास त्याने कारंजा शहर पोलीस ठाण्यासमोर आपली कार थांबवली. पोलीस ठाण्यात आत जाऊन त्याने पोलिसांना थेट सांगितले की, मी पत्नीची हत्या केली असून तिचा मृतदेह बाहेर कारमध्ये आहे. हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले. 

कारंजा पोलिसांनी तातडीने कारची तपासणी करून हसीनबानोचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

( नक्की वाचा : Nashik News:"त्यांनी आमचा 20 किमी पाठलाग केला अन्...", नाशिकच्या पीडित महिलेनं सांगितला भयंकर अनुभव, VIDEO )

का केली हत्या?

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने सलमानने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मात्र, चौकशीदरम्यान आरोपी पती वारंवार आपले जबाब बदलत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारंजा पोलिसांनी तात्काळ फॉरेन्सिक म्हणजेच न्यायवैद्यक पथकाला पाचारण केले असून घटनास्थळ आणि गाडीतील पुरावे, रक्ताचे नमुने आणि बोटांचे ठसे गोळा केले आहेत. या हत्याकांडात कारमध्ये अन्य कोणाचा सहभाग होता का, यादृष्टीने कारंजा शहर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com