जाहिरात

Samriddhi Highway : 'समृद्धी'मुळेच समृद्धी आली, महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदल झाला?

राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून जमिनी किती (Land Acquisition of Farmers' Lands) कोटींमध्ये घेतल्या? शेतकऱ्यांनी त्या पैशांचं काय केलं? समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदल झाला याचा एनडीव्ही मराठीने आढावा घेतला आहे.

Samriddhi Highway : 'समृद्धी'मुळेच समृद्धी आली, महामार्गासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय बदल झाला?

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

समृद्धी महामार्गाच्या (Samriddhi Highway) धर्तीवर शक्तीपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway) भूसंपादन प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बाधित शेतकऱ्यांना जमिनीसाठी बाजारभावाच्या पाचपट मोबदला मिळणार आहे. समृद्धी महामार्गासाठी जमिनी दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पाचपट पैसे मिळाले, त्यांच्या आयुष्यात काय बदल झाला याचा एनडीव्ही मराठीने आढावा घेतला आहे. नागपूरजवळच्या सुकळीतील कापूस उत्पादक शेतकरी कवडूजी भोयर नागपूर-हिंगणा रोडवर चार एकर परिसरात लॉन सुरू करत आहेत.

समृद्धी महामार्गासाठी भोयर कुटुंबीयांच्या एकूण 50 एकर जमिनीपैकी 20 एकर जमीन संपादित करण्यात आल्या आहेत. भूसंपादनासाठी त्यांना राज्य सरकारकडून 21 कोटी रुपये मिळाले आहेत. 20 ते 21 कोटी रुपये आम्हाला मिळाले. समृद्धीमुळे आमच्या कुटुंबाची स्थिती उंचावण्यासाठी मदत झाली. माझा एक मुलगा इंजिनिअर आहे आणि तो मर्सिडीज बेंझमध्ये आहे. दुसरा मुलगा सिव्हिल इंजिनिअर असून त्याचे कंत्राटी काम आहे. संपूर्ण संपादित जमीन 20 एकर आहे. उरलेल्या 15 एकरांमध्ये उत्पादन घेतो आणि मिळालेल्या पैशातून आम्ही इतर ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत, अशी माहिती येथील शेतकरी कवडूजी भोयर (सुकळी, जिल्हा नागपूर) यांनी व्यक्त केली.

वडिलोपार्जित असलेल्या या जमिनीशी भोयर कुटुंबीयांचे भावनिक नाते आहे. पण त्यांचे तेव्हाचे उत्पन्न आणि समृद्धीमुळे मिळालेली नुकसानभरपाई त्यांच्या आयुष्यात आर्थिक समृद्धी आणेल, याची त्यांना खात्री पटली आणि त्यांनी समृद्धीसाठी जमीन दिली. यापुढे जाऊन ते म्हणतात की, आता मी हिंगणा रोडवर रस्त्याजवळ लॉन बांधत आहे. समृद्धीमुळेच आमच्या आयुष्यात समृद्धी आली.

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनासाठी राज्य सरकारने बाधित शेतकऱ्यांना पाचपट आर्थिक मोबदला दिला. त्यामुळे बाजारभावाच्या पाचपट पैसे हिंगण्यातील शेतकऱ्यांना मिळाले. भरीव नुकसानभरपाई मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी इतर ठिकाणी नवी शेतजमीन घेतली आणि उरलेल्या जमिनीत शेती करत आहेत. एका शेतकऱ्याने सांगितलं की, साडेबारा कोटी रुपये आम्हाला मिळाले. सासू-सासरे, दीर आम्ही असे प्रत्येकी चार-चार कोटी रुपये मिळाले. उरलेल्या जमिनीवर आम्ही शेती करतोय. कापूस आणि तूर लावतोय. आम्ही हिंगण्यात प्लॉट घेतला आहे आणि आता घर बांधत आहोत.

Mumbai Pune Expressway वरील वाहतुकीत मोठा बदल, 6 महिन्यांसाठी 'हा' एक्झिट मार्ग राहणार बंद!

नक्की वाचा - Mumbai Pune Expressway वरील वाहतुकीत मोठा बदल, 6 महिन्यांसाठी 'हा' एक्झिट मार्ग राहणार बंद!

नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सुकळीमधील रत्नमाला ढोके यांची एकूण 22 एकर जमीन होती. त्यापैकी समृद्धी महामार्गासाठी 7 एकर जमीन संपादित करण्यात आली. त्यासाठी त्यांना 12 कोटी रुपये मोबदला मिळाला. उरलेल्या जवळपास 15 एकर जमिनीत ढोके कुटुंब रब्बी आणि खरीप अशा दोन हंगामाची शेती करत आहे. मिळालेल्या पैशातून त्यांनी इतर ठिकाणी घर आणि शेती घेतली आहे. त्यामुळे समृद्धीमुळे आमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने समृद्धी आली, असे ढोके कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

समृद्धीप्रमाणेच बाधित शेतकऱ्यांना पाचपट आर्थिक मोबदला देण्याबाबत तसेच या महामार्गामुळे नष्ट होणाऱ्या घरांचे, शेततळ्यांचे, विहिरींचे, फळझाडांचे आणि बागायतींचे मूल्यांकन करून त्यासाठी वेगळी नुकसानभरपाई देण्यात आली. राज्याच्या विकासासाठी आमची काही जमीन गेली, त्यात आम्हाला आनंद आहे, असे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मत आहे. त्यामुळेच आम्ही प्रकल्पाला विरोध केला नाही, असे शेतकरी सांगत आहेत.

समृद्धी महामार्गामुळे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, वर्धा, अमरावती आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आल्याचे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सुरुवातीला काही राजकीय पक्षांनी समृद्धीच्या जमीन अधिग्रहणाला विरोध केला होता. पण विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही आपल्या जमिनी समृद्धीसाठी दिल्या आहेत. शेतजमिनीच्या नुकसानभरपाईसाठी मिळालेल्या पैशांचा उपयोग बहुतांश शेतकऱ्यांनी नवीन जमिनी खरेदीसाठी केल्याने शेतकरी समृद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग बांधणाऱ्या आणि आता शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पाचपट जमीन मोबदला हा शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी निश्चित केल्याचे एनडीव्ही मराठीला सांगितले आहे.

Zero Click Malware : 'झिरो-क्लिक' मालवेयर म्हणजे काय? ऑनलाईन फसवणुकीसाठी कसा वापर होतेय?

नक्की वाचा - Zero Click Malware : 'झिरो-क्लिक' मालवेयर म्हणजे काय? ऑनलाईन फसवणुकीसाठी कसा वापर होतेय?

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या एकूण लांबीपैकी 28 किलोमीटरचा महामार्ग हिंगणा तालुक्यातील जवळपास 31 गावांमधून जातो. एखाद्या प्रकल्पासाठी इतक्या जलद गतीने जमीन संपादन करून त्याचा मोबदला मिळण्याचा हा देशातील एक विक्रमच आहे, असं मत व्यक्त केलं जात आहे. हिंगणा तालुक्यातील सुकळी गावातील 20 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना 70 कोटी रुपये जमीन मोबदला मिळाला आहे. त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्गासाठीही पाचपट मोबदला मिळणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या बाधितांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: