एक अशी धक्कादायक बातमी जी वाचून तुमच्या ही पाया खालची जमीन सरकेल. ही घटना शाहजहानपूर जिल्ह्यातील जैतीपूर भागात घडली आहे. इथं रविवारी 15 दिवसांची एक जिवंत चिमुकली जमिनीत गाडलेली अवस्थेत आढळली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी बाळाला जमीनीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी रविवारी 'पीटीआय'ला सांगितले की, जैतीपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोडापूर गावात ही 15 दिवसांची चिमुकली छोट्या झाडांच्या मध्ये जमिनीत गाडलेली होती. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून एका गावकऱ्याने जवळ जाऊन पाहिले असता, त्याला चिमुकलीचा एक हात जमिनीतून बाहेर आलेला दिसला.
त्यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काळजीपूर्वक माती हटवून चिमुकलीला बाहेर काढले. द्विवेदी यांनी सांगितले की, त्यावेळी चिमुकलीचा श्वास सुरू होता. तिला स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. जिथून तिला पुढील उपचारांसाठी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य राजेश कुमार यांनी सांगितले की, दुपारी गंभीर अवस्थेत एका चिमुकलीला रुग्णालयात आणले होते.
बचावलेल्या या निरागस बाळाच्या हातातून रक्त वाहत होते. तिच्या कान व तोंडात माती गेली होती. डॉक्टरांचा अंदाज आहे की, मुंग्यांनी चावल्यामुळे आणि कावळ्यांनी चोच मारल्यामुळे बाळाला जखमा झाल्या असाव्यात. तिला तात्काळ जैतीपूर सीएचसीमध्ये नेण्यात आले. जिथे प्राथमिक उपचारानंतर तिला चांगल्या उपचारांसाठी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले. बाळाची बोटे एकमेकांना जोडलेली आढळली, जी एक जन्मजात विकृती आहे.
पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव त्यागी यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. घटनास्थळी सापडलेल्या टिळ्याच्या खुणा आणि बाळाच्या अंगावर असलेल्या नव्या कपड्यांवरून असा अंदाज लावला जात आहे की, बाळ एखाद्या कुटुंबातील ‘छठी' कार्यक्रमादरम्यान तिथे असावे. पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमधूनही माहिती गोळा करत आहेत. उपनिरीक्षक इतेश तोमर यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून बाळाला मातीतून बाहेर काढले. या मानवी चमत्काराबद्दल लोक देवाचे आभार मानत आहेत की, बाळाचा श्वास अजूनही सुरू आहे.