- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पाचोड येथे ८० वर्षीय आजीवर २८ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केले
- आरोपीने मदतीच्या बहाण्याने आजीला घरात नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली आणि लैंगिक अत्याचार केले
- आजीच्या आरडाओरडीने परिसरातील नागरिक तात्काळ घटनास्थळी धावले आणि तिला आरोपीच्या तावडीतून मुक्त केले
तरुण,महिला, मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. राज्यात एक एक अशा घटना समोर येत आहेत त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुठे ना कुठे महिलांवर मुलींवर अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. हे कमी म्हणून की काय छत्रपती संभाजी नगरच्या पाचोड इथून एक अत्यंत धक्कादायक आणि माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. यात एका 80 वर्षाच्या आजीवर 28 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पैठण तालुक्यातील पाचोड येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पाचोड इथल्या कल्याणनगर परिसरात पिडीत आजी राहते. सोमवारी दुपारच्या वेळी या भागात जोरात वारा सुटला होता. त्यात ही आजी अडकली होती. त्याच वेळी तिथे रोहन आहेर हा नराधम होता. त्याने आजीची स्थिती पाहीली. त्याच वेळी तिचा गैरफायदा घेण्याचं त्याने ठरवलं. त्याने आजीला मदत करतो असं सांगितलं. आजीला ही त्याचा आधार वाटला. पण पुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पनाही आजीने केली नसेल. मदतीच्या बहाण्याने तो आजीला आपल्या घरात घेवून गेला.
घरात गेल्यानंतर रोहनने आजीसोबत जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने लैंगिक अत्याचार ही केले. यावेळी आजीने आरडाओरडा केला. हा आरडाओरडी ऐकून परिसरातील नागरिक आणि महिलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लोकांनी रोहनच्या तावडीतून त्या आजीला सोडवले. याबाबत माहिती आजीच्या नातेवाईकांना देण्यात आली. ते ही तिथे उपस्थित झाले. त्यानंतर आजीला पाचोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राम बारहाते करीत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड येथील कल्याणनगर परिसरात ही माणूसकीला काळिमा फासणारी आणि तेवढीच संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाचे पडसाद उमटत आहे. लोकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. तरुणी मुली असुरक्षित आहेतच पण आता वृद्ध महिलांवर ही अत्याचार होत आहे. कायद्याचा कुणाला धाक राहीला आहे की नाही असा संतप्त सवाल नागरीक करत आहेत. दरम्यान या प्रकरणी आरोपी तरूणाला पोलीसांनी अटक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world