- बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सुटाळा बुद्रुकमध्ये सख्ख्या भावाने मोठ्या भावाचा चाकूने खून केला आहे
- वादाच्या भरात देविदासने लहान भावाला हाताने मारल्यावर संतप्त मंगेशने चाकूने वार केले
- देविदास महादेव गायकी असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे
अमोल सराफ
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान एका भीषण हत्येत झालं. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडली. सख्ख्या लहान भावानेच मोठ्या भावाच्या पोटात चाकू खुपसून त्याचा खून केला. पोलीस तपासात हे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खामगावच्या सुटाळा बुद्रुक येथील ही घना आहे. सर्वात धक्कादायक बाबमध्ये ही हत्या लवपण्यासाठी दृश्यम चित्रपटाचा आधार घेण्यात आला होता.पण पोलीसांनी आरोपीचा बनाव बरोबर पकडला आणि त्याला गजाआड केला.
5 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मृतक देविदास महादेव गायकी हा आपल्या मित्रासह दारू पिऊन घरी आला होता. यावेळी त्याचा लहान भाऊ मंगेश महादेव गायकी घरी होता. यावेळी देविदासच्या मित्राला लहान भावाने तू 'घरी जा' असे म्हटले. यावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. वादाच्या भरात देविदासने मंगेशच्या डोक्यात हातातील कडे मारले. यामुळे संतप्त झालेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून देविदासच्या डाव्या कुशीत आणि पोटात वार केले. या हल्ल्यात देविदास गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू ही झाला.
घटनेनंतर आरोपी आणि त्याच्या पालकांनी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला "कोण्या अज्ञात व्यक्तीने देविदासवर वार केले" अशी खोटी माहिती आईने पोलिसांना दिली. यावेळी संशय आल्याने वडील महादेव गायकी व लहान मुलगा आरोपी मंगेश महादेव गायकी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी सहकाऱ्यांसह रात्री 2 वाजता घटनास्थळाची पाहणी केली. शिवाय घराची झडती घेतली. यावेळी मृतकाची आई पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करत होती.
नक्की वाचा - Maha Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली? पैसे वाढले का?
जणू काही 'दृश्यम' चित्रपटाप्रमाणे बनावट घटनाक्रम मांडून पोलिसांना फसवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यातून पोलीसांचा संशय वाढत गेला. शेवटी पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पहाटेच्या सुमारास आरोपी मंगेश गायकी याने आपला गुन्हा कबूल केला. लीला महादेव गायकी यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंदार पुरी करत आहेत. या घटनेमुळे सुटाळा परिसरात खळबळ माजली असून कौटुंबिक वादातून सख्ख्या भावानेच भावाचा जीव घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.