- एका न्यायाधीशाच्या गाडीवर खाजगी चालक अर्जुन पासवानने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहे
- आरोपीने खुनाचा खोटा आरोप शेजाऱ्यांवर केला परंतु तांत्रिक पुराव्यांमुळे तो उघड झाला
- अर्जुनला दारूचे व्यसन असून दारूपासून झालेल्या वादानंतर पत्नीवर गोळी झाडली होती
एका न्यायाधीशाच्या (ADJ-4) गाडीवर खाजगी चालक म्हणून काम करणाऱ्या अर्जुन पासवान यानेच आपल्या पत्नीची हत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 30 जानेवारी रोजी चौहट्टा मोहल्ल्यात गुडीया देवी या महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी पतीने पोलिसांना चकवा देण्यासाठी शेजाऱ्यांवर खुनाचा आळ घातला होता. तसा बनाव ही त्याने केला होता. त्याने केलेला खून पचला ही होता. मात्र पोलिसांनी वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे 24 तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना बिहारच्या वैशाली इथं घडली.
या घटनेनंतर अर्जुनने दावा केला होता की, त्याची पत्नी पाणी भरत असताना जुन्या वादातून शेजाऱ्यांनी तिची हत्या केली. मात्र, तपासादरम्यान एसडीपीओ सुबोध कुमार यांना संशय आला. गोळी झाडल्यानंतर घरातील कोणालाच आवाज आला नाही, हा दावा संशयास्पद वाटला. त्यानंतर तांत्रिक पुरावे आणि वैज्ञानिक तपासात अर्जुनचे खोटे बोलणे उघड झाले. त्याचे एक खोटे बोलणे पोलीसांनी पकडले. त्यामुळे त्याचा परदाफाश झाला.
अर्जुनला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो घरामध्ये अवैध पिस्तूल ठेवायचा. 29 जानेवारीच्या रात्री दारू पिण्यावरून पती-पत्नीत वाद झाला. संतापलेल्या अर्जुनने पत्नीवर थेट गोळी झाडली. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने हत्येत वापरलेले पिस्तूल आणि काडतूस बागेत फेकून दिले होते. जे पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोपीने पोलिसांना सांगितले होते की, पाणी भरताना पत्नीची हत्या करण्यात आली. मात्र पोलिसांनी कडक चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास असून तो सतत हिंसक वागायचा. त्याने शेजाऱ्यांशी असलेल्या जुन्या वैमनस्याचा फायदा घेत त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती एसडीपीओ सुबोध कुमार यांनी दिली. पत्नीची हत्या केल्यानंतर जखमी अवस्थेत तिला दवाखान्यात नेण्याचे नाटक त्याने केले होते. त्याच वेळी अर्जुनने रस्त्यात पिस्तूल आणि मॅगझीन लपवले होते. पोलिसांनी ते सर्व साहित्य जप्त केले असून आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा अर्जून न्यायाधिशांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world