राजस्थानमधील श्रीगंगानगर येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हरियाणातील एका 45 वर्षीय युवकाने कारमध्ये पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी गाडीतून मोठा आवाज आला. तो ऐकून आजूबाजूचे लोक धावले, परंतु तोपर्यंत युवकाचा जीव गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या चार दिवसांपूर्वीच या युवकाचा त्याच्या लिव्ह इन पार्टनरसोबत मोठा वाद झाला होता. त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले असल्याचं बोललं जात आहे.
ही घटना कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील सद्भावना नगर येथील पावन धामजवळ घडली. सोमवारी सकाळी 11:15 वाजता हा प्रकार समोर आला. हरियाणाच्या बावल येथील रहिवासी असलेला सुरजीत सिंह (45) श्रीगंगानगरमध्ये त्याच्या लिव्ह इन पार्टनरसोबत राहत होता. कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अमन कुमार यांनी सांगितले की, सुरजीत आणि त्याची लिव्ह इन पार्टनर दोघेही पावन धाम परिसरात राहात होते.
शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी दोघांमध्ये मोठे भांडण झालं होतं. सोमवारी सकाळी सुरजीत कार घेऊन आला. त्याच्या गाडीत सामान भरलेलं होतं. त्याने घरासमोरच गाडीत पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले. आग लागताच मोठा धमाका झाला. शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण सुरजीत गाडीतच होता आणि गंभीररित्या भाजल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. हे दोघेही पाच महिन्यांपूर्वी येथे राहायला आले होते. त्यांचे वारंवार वाद होत असत, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. पोलीस सध्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करत आहेत. मृत सुरजीतच्या कागदपत्रांमध्ये लुधियाना, हरियाणा आणि भिवाडीचे पत्ते आढळले आहेत, ज्याची तपासणी सुरू आहे.