ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Train News: रेल्वेने दिल्ली, यूपी किंवा बिहारकडे प्रवास करताना सावधगिरी बाळगणारे महाराष्ट्रातील प्रवासी प्रत्यक्षात स्वतःच्याच राज्यात सर्वाधिक असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो म्हणजेच एनसीआरबीच्या 2024 च्या अहवालानुसार, रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) यांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील आकडेवारी चिंताजनक आहे.
काय आहे आकडेवारी?
एनसीआरबीच्या अहवालानुसार, 2024 मध्ये देशभरात जीआरपीने एकूण 83,699 गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी एकट्या महाराष्ट्रात मालमत्ता चोरी, जबरी चोरी आणि दरोड्याचे 20,519 गुन्हे दाखल झाले आहेत. चोरीच्या उद्देशाने होणाऱ्या या गुन्ह्यांमुळे सामान्य प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, देशात नोंदवलेल्या एकूण 59,521 मालमत्ता चोरीच्या गुन्ह्यांपैकी 19,714 गुन्हे फक्त महाराष्ट्रातील रेल्वे मार्गांवर घडले आहेत.
( नक्की वाचा : Pune News: 4 मुली, सातवा मजला अन् नराधम सुरक्षारक्षक; 10 वर्षांच्या 'दुर्गे'मुळे टळला मोठा अनर्थ )
महिला आणि मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न
केवळ चोऱ्याच नाही, तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनीही रेल्वे प्रवास असुरक्षित केला आहे. अहवालानुसार, महाराष्ट्रात रेल्वे प्रवासादरम्यान बलात्काराचे 6 तर लैंगिक अत्याचाराच्या 45 घटनांची नोंद झाली आहे. महिला आणि बालकांवरील एकूण अत्याचाराचे 146 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांचे 11 गुन्हे नोंदवले गेले आहेत, जे महाराष्ट्रातील रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करतात.
मुंबई लोकल आणि गर्दीचा गुन्हेगारांना फायदा
पोलीस निरीक्षकांनुसार, मुंबई उपनगरीय लोकल सेवेतील अफाट गर्दी गुन्हेगारांसाठी सोपे लक्ष्य ठरत आहे. दररोज धावणाऱ्या 400 हून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सुमारे 80 लाख प्रवाशांची वर्दळ यामुळे गुन्हेगारांना चोरी करणे सोपे जाते. झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल आणि पाकीट पळवणे, महिलांची छेडछाड आणि गर्दीचा फायदा घेऊन अपहरण करणे अशा घटना रेल्वे स्थानक परिसरात वारंवार घडत आहेत.
प्रवासादरम्यान सतर्क राहण्याचे आवाहन
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना वारंवार खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंचे स्वतः रक्षण करणे आणि अनोळखी व्यक्तींवर विश्वास न ठेवणे आवश्यक आहे.
प्रवासात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली किंवा अनुचित प्रकार घडला, तर त्वरित जीआरपी किंवा आरपीएफच्या मदतीसाठी असलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world