अजमद खान, कल्याण
धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाले आणि पाहता-पाहता या वादाचे रुपांतर जोरदार हाणामारीमध्ये झाले. या हाणामारीमध्ये दोन प्रवासी गंभीर स्वरुपात जखमी झाले होते. यापैकी दत्तात्रय भोईर (वय 55 वर्ष) नावाच्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अमोल परदेशी आणि तनुज जुमवाल अशी अटक केलेल्या प्रवाशांची नावे आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
क्षुल्लक कारणावरून हाणामारी
फरार असलेल्या त्यांच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. रविवारी (28 एप्रिल) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शेवटच्या कसारा लोकलमध्ये एक प्रवासी गट दुसऱ्या प्रवासी गटाला चिडवत असल्याच्या गैरसमजातून जोरदार हाणामारी झाली. टिटवाळा आणि वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली होती.
(नक्की वाचा: 'ड्राय डे'ला मद्यविक्री करणं पडले महागात, रेस्टॉरंटवर मोठी कारवाई)
शहापूर तालुक्यातील चांदिवली परिसरात राहणारे दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे त्यांच्या दोन मित्रांसोबत उल्हासनगरमध्ये हळदी समारंभासाठी आले होते. कार्यक्रम आटोपून चौघांनी घराकडे परतण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकातून शेवटची कसारा लोकल पकडली. आंबिवली स्थानकामध्ये चार जणांचा आणखी एक गटाने त्याच डब्यामध्ये प्रवेश केला.
(नक्की वाचा : आईला सतत होणाऱ्या मारहाणीमुळे मुलाचे टोकाचे पाऊल, वडिलांची दगडाने ठेचून हत्या)
धारदार शस्त्राने हल्ला
यानंतर दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोशे यांची त्यांच्या मित्रांसोबत थट्टामस्करी सुरू होती. पण ही मंडळी आपल्यालाच पाहून हसत असल्याचा गैरसमज दुसऱ्या गटाला झाला. समोरचा गट आपल्याला चिडवत असल्याच्या गैरसमजातून वादास सुरुवात झाली. वादावादी सुरू असतानाच एका प्रवासी गटाने दुसऱ्या गटावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दत्तात्रय भोईर आणि प्रदीप सिरोश गंभीर जखमी झाले होते. जखमींना खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. पण दत्तात्रय भोईर यांचा गुरुवारी (2 मे 2024) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
VIDEO: वाढत्या उष्णतेमुळे वैयक्तिक आयुष्यात वादळ, मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक वास्तव
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world