सौरभ वाघमारे, सागर जोशी, प्रतिनिधी
Dr. Shirish Valsangkar Suicide : सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या न्यूरोफिजिशियल डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात आता एक महत्त्वाचा आणि अनपेक्षित ट्विस्ट आला आहे. या प्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या मनीषा मुसळे यांच्या वकिलांनी न्यायालयात केलेल्या दाव्यानंतर, या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण?
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. मात्र, आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांना एका महिला कर्मचाऱ्याचे तीन फोन आले होते, असा दावा आरोपी मनीषा मुसळे यांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. यामुळे, आता या फोन कॉलचे तपशील आणि टॉवर लोकेशन तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
महिला कर्मचाऱ्याचे कॉल आणि वकिलांचा दावा
आरोपीच्या वकिलांनी कोर्टात असा दावा केला आहे की, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या दोन दिवस आधी, म्हणजेच 16 आणि 17 एप्रिलला, आर. राऊत नावाच्या महिला कर्मचाऱ्याने डॉ. वळसंगकर यांना अनेक वेळा कॉल केले होते. यामुळे, डिसेंबर 2024 ते 1 मे 2025 या कालावधीतील डॉ. वळसंगकर, पी. राऊत आणि आर. राऊत यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तसेच टॉवर लोकेशन तपासण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील 3 अल्पवयीन मुलं शेगावला निघाले आणि मुंबईच्या ट्रेनमध्ये सापडले! वाचा कसा लागला शोध? )
वकिलांनी कॉलच्या वेळा आणि कालावधीचे तपशील कोर्टात सादर केले आहेत. 16 एप्रिलला डॉ. वळसंगकर यांना अनेक कॉल आले, त्यापैकी बहुतांश कॉल 1 ते 2 मिनिटांचे होते. 16 एप्रिल रोजी झालेल्या काही संभाषणांचा कालावधी 577 सेकंद, 744 सेकंद, 121 सेकंद आणि 227 सेकंद इतका होता.
त्यानंतर, 17 एप्रिलला राऊत यांनी तीन वेळा कॉल केला. त्यावेळी 1426 सेकंद, 228 सेकंद आणि 67 सेकंद इतके बोलणं झाले. आत्महत्येच्या दिवशी, म्हणजेच 18 एप्रिल रोजी, रात्री डॉ. वळसंगकर यांचे पुत्र डॉ. अश्विन यांचेही कॉल आले, परंतु तो कॉल काही सेकंदांचा होता. त्याआधी झालेले तीनही कॉल त्या महिला कर्मचाऱ्याचे होते, असे वकिलांनी सांगितले आहे. अधिकृत नोंदीनुसार, रात्री 7.57 वाजता वळसंगकर त्या महिलेसोबत 5 सेकंद, 8.25 वाजता 31 सेकंद आणि 8.28 वाजता 18 सेकंद बोलले. नंतर 8.32 वाजता डॉ. अश्विन यांचा 44 सेकंदांचा कॉल आला होता.
( नक्की वाचा : Pune News : एक बाई आणि 12 भानगडी! ॲसिड हल्ला ते पुरुषांवर जबरदस्ती ! 'या' बाईची संपूर्ण पुण्यात चर्चा )
सुसाईड नोटमधील आरोप काय?
दरम्यान, डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट आढळली होती. त्या सुसाईड नोटमध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉ. वळसंगकर यांनी केला होता. सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिले होते की, "ज्या माणसाला शिकवून मी आज ए.ओ. (प्रशासकीय अधिकारी) केले आणि चांगला पगार देत आहे. त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे. त्याचे मला अतीव दुःख आहे. म्हणून मी माझे जीवन संपवत आहे."
आता मनीषा मुसळे यांच्या वकिलांच्या या नवीन दाव्यानं आणि त्यांनी केलेल्या सीडीआर तपासणीच्या मागणीमुळे या प्रकरणात एक नवीन आणि महत्त्वपूर्ण ट्विस्ट आला आहे. त्यामुळे, सदर बाजार पोलीस या नव्या दिशेने तपास करतात का आणि पोलीस तपासात नेमके काय सत्य समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world